: बारामतीत एका बँडपथकात वाजंत्री म्हणून काम करणारा शेखर नामदास लवकरच मंत्रालयात बसणार आहे. आतापर्यंत बँड पथकात ताशा वाजवणारे हात महत्त्वाच्या फाईलींवर सह्या करतील. संघर्षातून सुरु झालेला त्याचा प्रवास जिद्दीच्या जोरावर सफल झाला आहे. ताशा वाजवणारा शेखर एमपीएससीची परीक्षा पास झाला आहे.
एका लग्नात ताशा वाजवत असताना बारामतीच्या शेखर नामदासला एमपीएससी परीक्षा पास झाल्याचा फोन आला. शेखरचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र त्याक्षणी तो ही गुडन्यूज कुणाला सांगू शकला नाही.
वडिल ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आणि आई शेतमजूर असलेल्या शेखरचं हे सुवर्ण यश फक्त आणि फक्त त्याच्या जिद्दीचं आणि मेहनतीचं फळ आहे. शेखरच्या यशानं बारामतीतल्या वाणेवाडीत आनंद साजरा केला जात आहे.त्याच्या आईवडिलांना कल्पनाही नाही की त्यांच्या मुलानं कोणता पराक्रम केला आहे, मात्र तो साहेब होणार याचा आनंद त्यांच्या चेहर्यावरुन ओसंडून वाहतोय.मिळालेलं यश मोठं आहे. ते टिकवून ठेवण्याचं, आणखी वाढवण्याचं ध्येय शेखरपुढे आहे. त्यातही तो यशस्वी होईल याच सदिच्छा.