: हिंजवडीजवळ माण गावातील बोडकेवाडी येथील वीटभट्टीवर एका दीड वर्षांच्या चिमुरड्याचा कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) सकाळी उघडकीस आली. संदीप शावाप्पा नाटेकर असं या दुर्दैवी चिमुरड्याचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माण गावच्या हद्दीत असलेल्या बोडकेवाडीतील वीटभट्टीवर नाटेकर कुटुंबीय काम करतात व तेथेच वास्तव्यास आहेत. कुडाचे घर असल्यामुळे त्यांच्या घराला दरवाजा नाही. काल रात्री नाटेकर झोपले असता त्यांचा दीड वर्षांचा मुलगा संदीप हा खेळत खेळत घराबाहेर गेला. त्यावेळी तेथील भटक्या कुत्र्यांनी संदीप याच्यावर हल्ला केला. यामध्ये संदीप याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सकाळी नाटेकर पति-पत्नी उठल्यानंतर संदीप घरात न दिसल्याने शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली. हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते तपास करत आहेत.