लोकनेते गणेश नाईक यांचा विरोधकांना इशारा
सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : सत्तेचा गैरवापर करुन नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे प्रकार सुरुच राहिल्यास रस्त्यावर उतरुन जशास तसे उत्तर देवू, असा इशारा लोकनेते गणेश नाईक यांनी विरोधकांना दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा भरगच्च कार्यकर्ता मेळावा वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात रविवारी पार पडला. त्याप्रसंगी लोकनेते नाईक यांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, ज्येष्ठ समाजसेवक ज्ञानेश्वर नाईक, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, महिला अध्यक्षा माधुरी सुतार, युवक अध्यक्ष सुरज पाटील, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जब्बार पटेल, स्थायी समितीच्या सभापती नेत्रा शिर्के, पालिका सभागृहनेते जयवंत सुतार, वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकनेते नाईक यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. नवी मुंबई विकासात आघाडीवर आहे. भाजपा-शिवसेना युतीची सत्ता असलेल्या मुंबई, ठाणे, कल्याण या शहरांमध्ये त्यांनी काय विकास केला? याचे प्रथम उत्तर द्यावे आणि मग नवी मुंबईवर टिका करावी, असा टोला त्यांनी लगावला. निवडणुकीत एकमेकांचे वाभाडे काढायचे आणि निवडणुकीनंतर सत्तेच्या लालसेपोटी एकत्र यायचे. शिवसेना आणि भाजपाचे असे संधीसाधू राजकारण असल्याची टिका केली. शिवसेना सत्तेत आहे की विरोधात? हेच कळत नाही. उध्दव ठाकरे यांनी आपली भुमिका अगोदर स्पष्ट करावी, अशी टिका त्यांनी केली. यापूर्वी आमदारपदाच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी जिंकल्याचा दाखला देत ज्यांना इतिहास माहित नाही त्यांनी आमच्या नादाला लागू नये, असा सल्लाही त्यांनी फुटकळ विरोधकांना लगावला. पदांपेक्षा तत्वांना आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य दिल्याने नवी मुंबईकरांनी देशभरात असलेली नरेंद्र मोदींची लाट मोडित काढून पालिकेची सत्ता पुन्हा एकदा विश्वासने सुपूर्द केली आणि नेरुळ प्रभाग क्रं-88च्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजयी केल्याचे ते म्हणाले.
महापालिकेचा पैसा राजकारणासाठी कधीच वापरलेला नाही. जे असा आरोप करतात त्यांनी ते सिध्द करुन दाखवावे, असे थेट आव्हान लोकनेते नाईक यांनी विरोधकांना केले. नवी मुंबई हे अगोदरच स्मार्ट शहर आहे. येत्या चार वर्षात पाच हजार कोटींच्या विकासनिधीतून महापालिकेच्या माध्यमातून नवी मुंबईला स्मार्ट शहरांपेक्षाही उत्कृष्ट शहर बनवू,असा विश्वास व्यक्त केला.
नवी मुंबईत राष्ट्रवादीची पक्षबांधणी मजबूत झाल्याने विरोधकांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना खोटयानाटया प्रकरणांत अडकविण्याचे षडयंत्र रचले जाण्याचा धोका त्यांनी बोलून दाखविला. सत्तेचा दुरुपयोग करुन असे कुटील प्रकार कुणी केल्यास आमचे कार्यकर्ते त्याला चोख उत्तर देतील, असा इशारा दिला.
देशाबाहेरील काळा पैसा परत भारतात आणून प्रत्येक कुटुबाला प्रत्येकी 15 लाख देण्याची बढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना भाषणात मारली होती. मोदींच्या त्या पोकळ आश्वासनाची ध्वनीचित्रफित कार्यकर्त्यांना दाखविण्यात आली. या आश्वासनावर चौफेर टोलेबाजी करीत लोकनेते नाईक म्हणाले की, मोदी हे उत्कृष्ट नटसम्राट आहेत. 15 लाख तर मिळाले नाहीत मात्र अवघे 15 रुपये नागरिकांच्या बँक खात्यांवर आले आहेत. 2 हजार कोटींचा काळा पैसा भारतात परत आणल्याचे सरकार सांगते. मग तो पैसा कुठे गेला? असा खडा सवाल लोकनेते नाईक यांनी केला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार मंत्री असताना लोकशाही मार्गाने काम करीत होतो. आजही त्याच भुमिकेतून कार्यरत आहे आणि यापुढेही राहणार आहे. कार्यकर्त्यांनी देखील अंतकरणाने आणि झोकून देवून जनसेवा करावी, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
सीबीडीतील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत काटकर यांच्यासह भाजपाच्या 130 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांचे स्वागत लोकनेते नाईक यांनी केले.
या मेळाव्यात जिल्हा, तालुका आणि प्रभागनिहाय पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. मेळाव्याची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. कवीवर्य मंगेश पाडगावकर, कामगारनेते बाबू थॉमस, माथाडींचे नेते बाबुराव रामिष्टे, ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर, माजी मंत्री दौलतराव आहिर, अभिनेत्री साधना, गीतकार निदा फाजली, कामगारनेते अशोक पोहेकर, पठाणकोट दहशतवादी हल्ल्यात आणि सीयाचिन हिम उत्पातामध्ये शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.