राष्ट्रवादीकडून आयोजकांच्या चौकशीची मागणी
मुंबई : मेक इन इंडिया कार्यक्रमाचा एक भाग असलेल्या गिरगाव चौपाटीवरील महाराष्ट्र रजनी सोहळ्यात मंचाला भीषण आग लागली. नियोजनातील अभावामुळे हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली. तर मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी या आगीच्या चौकशीची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर म्हणाले की, ही दुर्दैवी घटना आहे. नियोजनात ढिसाळपणा असल्याचे हे उदाहरण असून या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी करण्याची गरज आहे. तसेच अशा प्रकारच्या मोठ्या कार्यक्रमावेळी सुरक्षेच्या योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज असते. त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याचा खुलासा होणे आवश्यक आहे. सुरक्षेच्या कारणास्तव उच्च न्यायालयाने गिरगाव चौपाटीवरील कार्यक्रमास सुरुवातीला परवानगी नाकारली होती, याकडे लक्ष वेधत अहिर म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या नकारानंतर राज्य सरकारने हा मुद्दा प्रतिष्ठेचा करत सर्वोच्च न्यायालयात जाऊन कार्यक्रमाची परवानगी मिळवली होती. यानंतरही जर अशी दुर्घटना होत असेल तर हे या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या राज्य सरकारचे अपयश असल्याचा आरोपही त्यांनी केला.