सातारा : महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना मोटरसायकल भाडेतत्त्वावर काही दिवसात मिळणार असून या व्यवसायाला विरोध दर्शवण्यासाठी महाबळेश्वर, पाचगणी भागातील टॅक्सीसंघटनांनी चांगलाच विरोध केला आहे. त्यांच्या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला आहेच, शिवाय या टॅक्सीचालकांसाठी चक्क उदयनराजेंनी रस्त्यावर उतरुन आंदोलनही केलं आहे. या व्यवसायाला प्रशासनाने परवानगी दिलीच तर यामुळे महाबळेश्वरातील वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.
‘एक बार जो मैने कमिटमेंट कर ली, तो मै खुद की भी नही सुनता.’ उदयनराजेंच्या स्टाईल मधील ही धमकी महाबळेश्वरातील टॅक्सी व्यवसायिकांसाठी आहे. पर्यटकांचं आकर्षण असलेल्या महाबळेश्वरमध्ये काही दिवसातच रेंटवर बाईक मिळणार आहेत. त्यामुळे येथील तब्बल दोन हजार टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. म्हणुनच उदयनराजेंसह सर्वांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं.
याबाबत तर खा. उदयनराजेंनी प्रशानसाला त्यांच्याच भाषेत उघडपणे दटावलं आहे. खासदारांची ही धमकी जरी कायदेबाह्य असली तरी स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांची उद्ध्वस्त होणारी घरं वाचणारी आहेत. या भागातला टॅक्सी व्यवसाय हा फक्त सिझनमध्येच चालत असतो, त्यात या थंडगार ठिकाणी येणार्या पर्यटकांमधील जवळपास ७० टक्के जण स्वतःची गाडी घेऊन येऊ लागले आहेत. त्यात जर रेंटवर बाईक सुरु झाल्या तर ब्रिटीश काळापासुन सुरु असलेला हा व्यवसाय संपुष्टात येणार आहे.
त्यामुळे संघटना आक्रमक झाली आहे. पैशाच्या आणि काही मंत्र्यांच्या ओळखीमुळे सुरु होणारा हा व्यवसाय आजिबात चालू देणार नाही असा इशारा टॅक्सी संघटनेने दिला आहे. टॅक्सी संघटनांनी सर्व संबंधित वरिष्ठ अधिकार्यांना आपला विरोध पत्राव्दारे कळवला आहे. तरीही
संबंधितांनी परवाने मिळवलेच. त्यात महाबळेश्वर मधील पीडब्ल्यूडीची जागाही भाडेतत्त्वावर पुण्यातून मिळवली आहे. त्यामुळे या परवानग्या घेणारे दर्डा नामक व्यक्ती नेमकी आहे कोण आणि त्यांच्या मागची खरी मंत्र्यांची साखळी कोणती याचा शोध महाबळेश्वरमधील टॅक्सी चालक घेत आहेत.