– ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त तामिळ हिंदू होते असा दावा गणेश दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या पुस्तकात करण्यात आला आहे. गणेश दामोदर सावरकर हे विनायक सावरकरांचे ज्येष्ठ बंधू असून आरएसएसच्या संस्थापकांपैकी एक आहेत.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्ताप्रमाणे मुंबईतील एक ट्रस्ट गणेश दामोदर सावरकरांनी लिहिलेलं ’ख्रिस्त परिचय’ पुस्तक पुन्हा आणत आहे. १९४६ साली हे पुस्तक गणेश दामोदर सावरकर यांनी लिहिलं होतं. या पुस्तकात येशू ख्रिस्त जन्माने विश्वकर्मा ब्राम्हण होते. तसंच ख्रिश्चन धर्म हा हिंदू धर्माचाच एक संप्रदाय आहे, ख्रिश्चन असा वेगळा धर्म नव्हता असा दावा करण्यात आला आहे.
या पुस्तकात येशू ख्रिस्त यांचा जन्म कुठे झाला याची माहिती देण्यात आलेली नाही. पुस्तकात नोंद केल्याप्रमाणे पॅलेस्टिन आणि अरब प्रदेश हिंदूंचा होता आणि येशू ख्रिस्त प्रवास करत भारतात पोहोचले होते जिथे त्यांनी योगाचं शिक्षण घेतलं. येशू ख्रिस्त तामिळ हिंदू असून त्यांच खरं नाव केशव कृष्ण होतं. तामिळ त्यांची मातृभाषा होती आणि त्यांचा रंग तामिळ लोकांप्रमाणे गडद होता असंही पुस्तकात सांगितल गेलं आहे.
येशू ख्रिस्त यांच्या १२व्या वर्षी मंदिरात ब्राम्हण परंपरेप्रमाणे त्यांची पवित्र मुंज करण्यात आली होती. पॅलेस्टीन तसंच आजूबाजुच्या प्रदेशात राहणारी लोक येशू ख्रिस्त यांना शंकर, विष्णुचा अवतार मानत असाही दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ बायबल ही येशू ख्रिस्त यांची शिकवण नसल्याचंही पुस्तकात म्हणल गेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संस्था २६ फेब्रुवारीला या पुस्तकाच अनावरण करणार आहे.