नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित जनविकास प्रबोधिनीने मराठी राजभाषा दिनानिमित्त वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात ७ दिवस आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनात ३ लाख रूपयांची पुस्तक विक्री आली. २० लकी ड्रा विजेत्यांना त्यांच्या आवडीची १० हजार रूपयांची पुस्तके मोफत देण्यात आल्याची माहिती मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजाजन काळे यांनी दिली.
या पुस्तक प्रदर्शनात दररोज विविध विषयांवर मान्यवरांच्या चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले होते. बालरंगभूमी, स्त्री साहित्य,कुसुमाग्रजांचा जीवनपट, आगरी नाट्य परंपरा अशा विविध विषयांवर श्रीहरी पवळे, रवी वाडकर, वृषाली मगदूम, डॉ. अजित मगदूम, अशोक पालवे, अमरजा चव्हाण व मोहन भोईर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या चर्चासत्रात मान्यवरांकडून कवीवर्य कुसुमाग्रज कट्ट्याची स्थापनासुध्दा याप्रसंगी करण्यात आली असून महिन्यातून एकदा या कट्ट्यावर नवी मुंबईकरांसाठी साहित्यिक चर्चांचा फड रंगेल. या संपूर्ण प्रदर्शनात किमान दहा हजाराहून अधिक नवी मुंबईकरांनी आपली उपस्थिती लावली असून ऐन दिवाळीत पुन्हा एकदा नवी मुंबईकरांसाठी पुस्तक प्रदर्शन घेण्याचा मानस असल्याचे मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी सांगितले.