खुल्यावर करतात ग्रामस्थ मलमूत्र
सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : उलवे नोडमधील सेक्टर ३ मधील मोरावे गावामध्ये सिडकोने बनविलेले सार्वजनिक शौचालय बिल्डरच्या इशाऱ्यावर गावगुंडांनी तोडल्यामुळे ग्रामस्थांना उघड्यावर मलमूत्र विसर्जन करण्याची वेळ आली आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीने एनआरआय पोलीस ठाण्यात व सिडकोकडे लेखी तक्रार केली आहे.
उलवे नोडमधील सेक्टर ३ स्थित भुखंड क्रं-७०वर २०१३ साली सिडकोने १० बैठकांचे सार्वजनिक शौचालय बनविले होते. त्यासाठी सिडकोने ३५ लाख रूपये खर्च केले. शौचालय बनविल्यावर सिडकोने ते सार्वजनिक शौचालय ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत केले. या शौचालयाची देखभाल ग्रामपंचायतच करत होती. ४ मार्चला सकाळी ११ वाजता गावातील मदन पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत जेसीबीच्या मदतीने शौचालय पाडून टाकले. हे कृत्य सद्गुरु बिल्डर्स अॅण्ड डेव्हलर्पसच्या इशाऱ्याने करण्यात आले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.या सार्वजनिक शौचालयाचा वापर ग्रामस्थांशिवाय नव्याने सुरु असलेल्या बांधकाम साईटवरील कामगारही करत होते. शौचालय तोडण्यात आल्याने ग्रामस्थांसहीत बांधकाम मजुरांना आता उघड्यावरच शौचासाठी बसण्याची वेळ आली आहे. हगदारीमुक्त परिसर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून युध्दपातळीवर प्रयत्न केले जात असतानाच दुसरीकडे बिल्डरने काही ग्रामस्थांना हाताशी धरून शौचालयच पाडल्याने या गावात उघड्यावरच शौचास बसण्याची वेळ आली आहे. शौचालय तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सिडको व एनआरआय पोलीसांकडे ग्रामस्थांनी केली असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील यांनी दिली.