मुंबई, – बँकांचे जवळपास ९००० कोटी रुपयांचे कर्ज बुडवलेले किंगफिशर एअरलाइन्सचे प्रमुख विजय माल्या हे नुसते पसार जाले नाहीत, तर ते २७५ कोटी रुपयांसह इंग्लंडला गेल्याचे समोर आले आहे. दियाजिओ या कंपनीने युनायटेड ब्रेवरीज तीन वर्षांपूर्वी माल्यांकडून विकत घेतली मात्र, कंपनीचे अध्यक्ष माल्याच होते. माल्या यांनी अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे यासाठी दियाजिओ आणि माल्या यांच्यामध्ये २५ फेब्रुवारी रोजी करार झाला. यानुसार माल्या यांना ५१५ कोटी रुपये देण्याचे दियाजियोने मान्य केले. या करारानुसार २७५ कोटी रुपये लगेच देण्यात आले व उर्वरीत पैसे पाच वर्षांच्या कालावधीत टप्प्या टप्प्याने देण्याचे ठरले. सदर ५१५ कोटी रुपये माल्यांना मिळू नयेत व त्यांनी देशाबाहेर जाऊ नये यासाटी बँका कोर्टात गेल्या.
त्यावेळी ऍटर्नी जनरलनी खुलासा केला आणि सगळ्यांना साक्षात्कार झाला की, माल्या २ मार्चलाच देश सोडून गेले आहेत. त्यामुळे हजारो कोटी रुपयांची कर्जे तर अधांतरीच असून शेवटी मिळालेले २७५ कोटी पण गेले अशी अवस्था झाली आहे.
माल्या परत भारतात येतील का? त्यांना भारतात आणता येईल का? यासंदर्भातले काही मुद्दे असे:
– विजय माल्या हे भारतीय नागरिक असले तरी गेले २८ वर्षे इंग्लंडचे रहिवासी आहेत.
– माल्या आपणहून भारतात आले नाहीत तर त्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द करावा लागेल.
– ज्या व्यक्तिचा पासपोर्ट रद्द होतो, त्याला अन्य देशांमध्ये राहता येत नाही आणि त्याला मायदेशात परतावे लागते.
– त्यामुळे पासपोर्ट रद्द केल्यानंतरच भारत सरकार इंग्लंड सरकारकडे विजय माल्यांची भारतात रवानगी करावी अशी मागणी करू शकते.