आ. मंदा म्हात्रेंच्या पाठपुराव्याला यश
बंद गाळ्यांमध्ये पुन्हा वर्दळ वाढणार
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये अतिरिक्त भाजीपाला आवारातील २८५ गाळे सन २००९ पासून भाजीपाला व्यवसाय होत नसल्यामुळे बंद पडले होते. राज्याचे पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे याबाबत भेट घेऊन बेलापुरच्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी कृषी पुरक शेतमाल विक्री करिता परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. विधानसभेतही ताराकिंत प्रश्न उपस्थित करून आ. मंदा म्हात्रेंनी व्यापार्यांच्या समस्येकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. आ. मंदा म्हात्रेंचा पाठपुरावा व समस्यानिवारणामागची तळमळ पाहता पणनमंत्र्यांनीही मागणीला मंजुरी दिल्याने आता या बंद गाळ्यांंमध्ये पुन्हा एकवार वर्दळ पहावयास मिळणार आहे.
भाजी मार्केटमधील बिगर गाळाधारक व्यापार्यांना त्यांच्या स्वत:च्या गाळ्यामध्ये व्यापार करता यावा याकरता भाजी मार्केटचे तत्कालीन संचालक अशोक गावडे यांच्या पाठपुराव्यामुळे व परिश्रमामुळे २८५ गाळ्यांची अतिरिक्त भाजी मार्केट निर्माण झाले.
सद्य:स्थितीत व्यापाराअभावी मार्केट बंद असल्याने व्यापार्यांच्या उदरनिर्वाहाची समस्या पाहता ही कोंडी फोडण्यासाठी आ. मंदा म्हात्रे यांनी पुढाकार घेत प्रशासनदरबारी पाठपुरावा सुरू केला.
विधानसभा तारांकित प्रश्न तसेच पाठपुरावा या माध्यमातून प्रत्यक्ष शासकीय बैठक आयोजित करण्याबाबत आमदार मंदा म्हात्रे या नात्याने बैठक आयोजित करून संबंधित गाळ्यांवर कृषी पुरक शेतमाल विक्री करिता परवानगी बाबत सातत्याने पाठपुरावा केला. व व्यापार्यांच्या समस्याप्रती आ. मंदा म्हात्रेंचा पाठपुरावा व कळकळ पाहील्यावर पणनमंत्री चंद्रकांत दादा यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी बैठकी दरम्यान आमदारांचा विषय हा कायदेशीर असल्यामुळे तसेच व्यापार्यांच्या उदर निर्वाहासाठी असल्यामुळे त्यास तात्काळ मंजुरी द्यावी अशा सुचना केल्या. त्या अनुषंगाने ११ मार्च २०१६ रोजी पणनमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ८ फेब्रुवारी रोजीच्या बैठकीतील चर्चेनुसार सर्वानुमते घेतलेला निर्णय नवी मुंबईतील कार्यक्रमात आमदारांच्या व कृषी उत्पन्न व्यापारी वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत जाहिर केला. सदर निर्णयामुळे अतिरिक्त भाजीपाला मार्केट यांच्या आवारातील २८५ गाळेधारक व्यापार्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.