नागपूर: ‘महाराष्ट्राचे तीन नाही तर चार विभाजन करणं जास्त सोईचं आहे. आणि पूर्वीपासून संघाची तीच भूमिका आहे.’ असं म्हणत स्वतंत्र मराठवाडा आणि विदर्भाच्या मागणीला राष्ट्रीय स्वंयसेवक संघानं समर्थन दिलं आहे.छोट्या राज्यांच्या स्थापनेसाठी राज्य पुनर्गठन आयोगाची स्थापना केली पाहिजे अशी मागणीही राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी केली आहे. ते आज नागपूरमध्ये बोलत होते. नव्या पुनर्रचनेत 3 कोटींपेक्षा जास्त आणि 50 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येचं राज्य नसावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. असं झालं तर महाराष्ट्राचे चार विभाजन होऊ शकतात.राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यामध्ये यापूर्वी महाराष्ट्राचे चार प्रांत करण्यात आलेत. त्यामुळे कारभार सोईचा व्हावा म्हणून महाराष्ट्राचं चौभाजन करण्याची मागणी पुढे आली आहे. यावर भाजप सरकार काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्वाचं आहे.दरम्यान, मा. गो. वैद्य यांच्या वक्तव्यावर सेनेनं सावध पवित्रा घेतला आहे. सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘माझा’शी बोलताना स्पष्ट केलं की, सेनेने अखंड महाराष्ट्रासाठी कायमच आंदोलनं केली आहेत. मात्र, वैद्य हे संघाचे मोठे कार्यकर्ते असून आम्ही त्यांचा आदर करतो. असं सरनाईक म्हणाले.