सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : पावसाळा अद्यापि दोन महिने बाकी असतानाच नवी मुंबईकरांना पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. नवी मुंबईत व्यावसायिकांकडून, सिडको सोसायट्यांकडून, गावठाण भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत जलवाहिन्यातून पाणीचोरी होत असतानाही महापालिका प्रशासन जाणिवपूर्वक कानाडोळा करत आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या विभाग कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना व कर्मचार्यांना अनधिकृत जलवाहिन्यांची माहिती असतानाही ते या पाणीचोरांवर कारवाई न करता नव्याने अनधिकृत जोडण्या देवून त्यांना सहकार्यच करत आहे. पाणीचोरी व नवी मुंबईकरांना सहन करावी लागणारी पाणीटंचाई याबाबत मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी नवी मुंबईकरांकडून केली जावू लागली आहे.
स्वमालकीचे मोरबे धरण असतानाही नवी मुंबईकरांना पाणीसंकटाचा सामना करावा लागत आहे. नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पाणीचोरीमुळे नवी मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नवी मुंबईतील हॉटेल व्यावसायिक, गावठाणातील इमारती,साडे बारा टक्क्याच्या इमारती, सिडको इमारती व इतर ठिकाणी सर्व्हे केल्यास मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळजोडण्या व जलवाहिन्या पहावयास मिळतील. विशेष म्हणजे या अनधिकृत जलवाहिन्या व नळजोडण्या मनपा विभाग कार्यालयातील पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारीच अनेक ठिकाणी टाकत असल्याचे पहावयास मिळते.
ज्यांनी पाणीचोरी पकडायची, तेच लोक अनधिकृत जलवाहिन्य व नळजोडण्या करण्यास सहकार्य करत असल्याने पाणीचोरांवर कारवाई होणार नाही आणि पाणीचोरीचा शोधही लागणार नसल्याची संतापजनक प्रतिक्रिया आता नवी मुंबईकरांकडून उघडपणे व्यक्त करण्यात येवू लागली आहे. इमानेइतबारे पाणीदेयक भरणार्या रहीवाशांना अवघ्या १ ते २ तासातच पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्यांना खर्या अर्थाने पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. परंतु अनधिकृत नळजोडण्या घेवून वावरणार्या रहीवाशी पाणीचोरीमुळे पाण्याच्या बाबतीत सुजलाम सुफलाम आहेत. पाणीचोरीमुळे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असतानाही पाण्याचे रखवालदार असलेले पाणीपुरवठा विभागाचे त्या त्या विभाग कार्यालयातील कर्मचारीच पाणीचोरांना मदत करत आहे. सिडको व साडेबारा टक्केच्या इमारतींच्या तुलनेत व्यावसायिकांकडून व गावठाण भागातील इमारतींमधून अधिक प्रमाणात पाणीचोरी होत आहे.