नाशिक : दुष्काळामुळे घोटभर पाण्यासाठी राज्यातील लोकांना संघर्ष करावा लागत आहे. इतकंच नाही दुष्काळाची झळ आता प्रथा परंपरांनाही बसत आहे. कारण इतिहासात पहिल्यांदाच काळाराम मंदिर धुण्याची परंपरा खंडीत झाली आहे.पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. गुढीपाडव्यापासून दरवर्षी राम नवमीचा उत्सव सुरु होतो. रंगपंचमीच्या आदल्यादिवशी मंदिर धुण्याची परंपरा आहे. कळसापासून पायऱ्यापर्यंत संपूर्ण मंदिर पाण्यानं धुतलं जातं. मंदिर धुण्यासाठी 5 बंब पाणी लागतं. पण यंदा दुष्काळामुळं त्याला फाटा देण्यात आला आहे.मराठवाड्यात अनेक भागात थेंबभर पाण्यासाठी काही किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते. जनावरांना प्यायला पाणी नाही. अशा दाहक अवस्थेत काळाराम मंदिराने पाणी बचतीसाठी टाकलेलं एक पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. पण पाऊसमान चांगलं होऊन पुन्हा महाराष्ट्रावर ही वेळ येऊ नये, हीच प्रार्थना राज्यातील जनता प्रभू रामचंद्रांकडे आहे.