नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी १३० ते १५० ट्रक कांदा तर ९५ ते १०० ट्रक सरासरी बटाटा येत आहे. कांदा ७ ते ९ रूपये तर बटाटा ९ ते ११ रूपये किलो या दराने मार्केटमध्ये विकला जात असल्याची माहिती मार्केटमधील व्यापारी अशोक वाळूंज यांनी दिली.महाराष्ट्राच्या नाशिक व पुणे जिल्ह्यातूनच कांद्याची सर्वाधिक आवक होत आहे. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या दोन राज्यातूनच बाजार आवारात बटाटा विक्रीसाठी येत आहे. सोमवारी आपल्या मागण्यांसाठी काम बंद ठेवण्याचा इशारा दिला असला तरी रविवार व सोमवार सलग दोन दिवस मार्केटचे व्यवहार बंद राहणार आहेत. कांदा-बटाटा हा शीघ्र नाशिवंतमध्ये मोडत नसल्याने मालाचे नुकसान होणार नसल्याचे अशोक वाळूंज यांनी सांगितले.मार्केटमध्ये कांदा अवघ्या ७ ते ९ रूपये किलो या दराने विकला जात असला तरी प्रत्यक्षात किरकोळ मार्केटमध्ये हाच कांदा १४ ते १७ रूपये किलो या भावाने तर बटाटा १५ ते १९ रूपये किलो या दराने विकला जात आहे.