मुंबई : राज्यात पडलेल्या दुष्काळाचे पडसाद आयपीएल सामन्यांवरही उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मराठवाडा व विदर्भामध्ये पाणीबाणी लक्षात घेता महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेले आयपीएलचे १९ सामने अन्य राज्यात आयोजित करण्याची मागणी मुंबई भाजपाचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी बीसीसीआयकडे एका निवेदनातून केली आहे.एका क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यापूर्वी क्रिडांगणाच्या देखभालीकरता किमान १ लाख लीटर पाणी लागते. आयपीएलचे १९ सामने मुंबई, पुणे आणि नागपूर या ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे या सामन्यादरम्यान क्रिकेटची खेळपट्टी व मैदान याची देखभाल करताना लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होणार असल्याचे गुप्ता यांनी निवेदनात म्हटले आहे.राज्यात सर्वत्र पाणीबाणीसदृश्य परिस्थिती असून दुष्काळग्रस्त भागातील जनता पाण्यासाठी त्रस्त झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वीच होळीच्या पार्श्वभूमीवर कोरडी होळी खेळण्याचे आवाहनही केले होते.राज्यातील दुष्काळ व पाणीटंचाई लक्षात घेता आयपीएल सामन्यांचे महाराष्ट्रात आयोजन केले तर ते दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार करण्यासारखे असल्याने अन्य राज्यात आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे. ९ मार्च ते २९ मेपर्यत आयपीएल स्पर्धा चालणार आहे.