नवी दिल्ली, – आज सायंकाळी चारच्या सुमारास भारतासह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. उत्तरेकडील दिल्ली, चंदिगढ, हरियाणा, श्रीनगर या राज्यांमध्ये रविवारी दुपारी ४ वाजून ०१ मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले. भुकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल ऐवढी होती. भूकंपाच्या धक्क्यानं दिल्ली मेट्रो प्रभावित झाली आणि तिची सेवा तात्पुरती थांबवली गेली होती. दिल्लीसह नोएडा आणि परिसरात पाच मिनिटांपर्यंत हे धक्के जाणवल्याची माहिती आहे. या भूकंपामुळे जम्मु काश्मीरसहितच एकंदरच उत्तर भारतामधील जनजीवन बाधित झाले.
भूकंपाचे केंद्रस्थान अफगाणिस्तानमधील एशकशाम या गावाजवळ होते. एशकशाम हे ठिकाण मध्य आशियातील ताजिकिस्तान या देशाच्या सीमारेषेपासून जवळ आहे. अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलपासून भूकंपाचे केंद्रस्थान हे ईशान्य दिशेस सुमारे २८२ किमीवर असल्याचे अमेरिकेच्या भूकंपमापन संस्थेने म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या (२०१५) ऑक्टोबर महिन्यात याच भागास शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला होता.
जम्मू काश्मीर, हरियाणा, चंडीगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथे भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. काबूल येथे भूकंपाचा तीव्र धक्का बसला. पाकिस्तानच्या माध्यमांनी देखील तेथील पंजाब प्रांतात धक्के बसल्याचे सांगितले आहे. सुदैवाने अद्याप जीवितहानीचे वृत्त आले नाही. या भूकंपामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी घराबाहेर पडून मोकळ्या जागांचा आश्रय घेतला.