सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महानगरपालिकेचे सह. शहर अभियंता जी.व्ही. राव यांचे निलंबन रद्द करून त्यांना सेवेत पुन्हा रूजू करण्याबाबतच्या आदेशावर वाघमारे यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे वाघमारेंबाबत जाता जाता त्यांच्या हेतूविषयी व भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राव हे सेवेत रूजू झाल्यास नवी मुंबई इंटक त्याविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी दिला आहे.
महापालिका कर्मचार्यांचा छळ करणे, शिवीगाळ करणे याबाबत विधीमंडळ अधिवेशनात ताराकिंत प्रश्नाद्वारे चर्चा होवूनही महापालिका आयुक्त व प्रशासनाने चौकशी प्रकरणात संशयास्पद भूमिका घेतल्याने कामगारांचे शोषण करणार्या व कामगारांचा अपमानास्पद वागणूक देणारे राव हे पुन्हा महापालिकेत रूजू झाल्यास इंटकतर्फे मोठा लढा उभारणार असल्याचा इशारा कामगार नेते रविंद्र सावंत यांनी दिला आहे.
महानगरपालिकेत सह.शहर अभियंता या जबाबदार पदावर काम करणार्या जी.व्ही.राव या अधिकार्यांने बेजबाबदारपणे काम करताना कामगारांशी अरेरावी करणे, कामगारांशी संभाषण करताना शिवीगाळ करणे, कामगारांचा छळ करणे अशा तक्रारी सातत्याने प्रकाशझोतात येवू लागल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषदेतील आमदार व माथाडी नेेते नरेंद्र पाटील यांनी अधिवेशनादरम्यान ताराकिंत प्रश्नाद्वारे सभागृहाचे व सभागृहाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. कामगार शोषणाबाबत सभागृहात ताराकिंत प्रश्नाला उत्तर देताना राव यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन नगरविकास राज्यमंत्र्यांनी रावप्रकरणी अधिवेशनात सभागृहात दिले होते.
नगरविकास खात्याच्या राज्यमंत्र्यांनी कारवाईचे व चौकशीचे निर्देश दिल्यावर महापालिका आयुक्तांनी त्यांना सुरुवातीस सक्तीच्या रजेवर पाठविले आणि त्यानंतर त्यांना निलबिंत केले. महापालिका आयुक्तांनी राव यांची विभागिय चौकशी करण्याचे आदेश दिले खरे, परंतु चौकशी अधिकार्यांनी चौकशीस सुरूवात करण्यापूर्वीच पालिका आयुक्तांनी विभागिय चौकशीचा आदेशच रद्द केला. विधीमंडळात प्रश्न मांडूनही नगरविकास खात्याच्या राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही पालिका आयुक्त विभागिय चौकशीचे आदेश रद्द करतात, त्यांनी जर खरोखरीच स्वाक्षरी केली असेल तर हा सर्व संशयास्पद प्रकार असून या सर्व प्रकरणाची खोलवर चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी केली आहे.
राव यांच्याबाबत गंभीर आरोप असल्यामुळे व त्याबाबत अधिवेशनादरम्यान ताराकिंत प्रश्न मांडला गेला असल्यामुळे त्यांची विभागिय चौकशीच महापालिका प्रशासनाने करणे आवश्यक होते. प्रशासनातर्ंगत कोणी कोणाविरोधात साधी तक्रार केल्यास प्रशासनाकडून प्राथमिक चौकशी केली जाते. राव यांच्याविरोधात गंभीर आरोप असतानाही महापालिका प्रशासनाने राव यांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश देत विभागिय चौकशीचे आदेश रद्द केले. या प्राथमिक चौकशीत तथ्य आढळल्यामुळेच राव यांना महापालिका आयुक्त वाघमारे यांनी निलंबित केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. परंतु महापालिका आयुक्तांना प्रशासनाने चुकीची माहिती दिली. राव यांना शिक्षा करण्याबाबत आयुक्तांची आग्रही भूमिका असताना इतरत्र रूजू होण्यापूर्वीच रातोरात राव यांना रूजू करण्याबाबतच्या आदेशावर आयुक्तांनी स्वाक्षरी कशी केली याबाबत महापालिका अधिकारी व कर्मचार्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राव हे कर्मचार्यांशी कसेही वागतात, शिव्या देतात, मनमानी करतात अशा तक्रारी असतानाही आयुक्तांनी त्यांना रूजू करण्याविषयीच्या आदेशावर स्वाक्षरी केल्याने मनपा कर्मचारी व अधिकार्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
महापालिका आयुक्त वाघमारे यांनी राव यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे जे आरोप करण्यात आले होते, त्याबाबत प्रशासनाकडून अभिप्राय मागविला होता, त्या अहवालाचे अद्यापि उत्तर आलेले नाही. आयुक्तांना पालिका प्रशासनाकडून चुकीची माहिती पुरविण्यात आली असून स्थानिक राजकारण्यांकडून टाकण्यात आलेल्या दबावाला आयुक्त बळी पडले असल्याचा आरोप रविंद्र सावंत यांनी केला आहे.
पालिका आयुक्तांची बदली चार दिवसापूर्वीच झालेली आहे. बदलीची ऑर्डर निघालेली असताना कोणतेही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेवू नयेत असे प्रशासकीय धोरणात्मक संकेत असताना आयुक्तांनी मोठ्या राजकीय दबावाखाली संकेत पायदळी तुडवित रावप्रकरणी स्वाक्षर्या केल्या असल्याची माहिती आपणास सूत्रांकडून समजले असल्याचे सावंत यांनी सांगितले.
महापालिका प्रशासनात काम करणार्या मागासवर्गिय कर्मचारी व अधिकार्यांच्या समस्या सोडविण्यास पालिका प्रशासनाला व आयुक्तांना वर्षानुवर्षे वेळ मिळालेला नाही. पदोन्नतीला न्याय देता आला नाही. वर्षानुवर्षे मागासवर्गिय कर्मचारी व अधिकार्यांना न्याय न देणार्या पालिका प्रशासनाला व आयुक्तांना रावप्रकरणी विशेष स्वारस्य दाखविण्यासाठी धावपळ करावी लागली. कामगारांवर अन्याय करणार्या, शिवीगाळ करणार्या रावसारख्या अधिकार्यांला पालिका प्रशासन पाठीशी घालून सेवेत रूजू करत असल्याने त्याविरोधात कामगार हितासाठी इटंकच्या माध्यमातून व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा रविंद्र सावंत यांनी दिला आहे.
राव यांना सेवेत घेण्यास आयुक्तांचा विरोध असताना त्यांनी स्थानिक राजकीय दबावाला दबावाला बळी पडून यावर स्वाक्षरी केली असल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात व राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महाराष्ट्र दिनी झेंडावंदनांचा कार्यक्रम झाल्यावर आयुक्तांच्या कार्यालयात या सर्व घडामोडी झाल्या असून प्रशासन विभागातील एका उपायुक्तांने धावपळ केल्याचे महापालिका मुख्यालयात सर्वांनी जवळून पाहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नवीन आयुक्त मुंडे हे महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार घेण्यापूर्वीच काही तास अगोदर या सर्व नाट्यमय घडामोडी घडल्याने आता नवी मुंबईकरांचे मुंडे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहीले आहे. आयुक्त मुंडे हे धाडसी असून कोणत्याही राजकीय दबावाला भीक घालत नसल्याची त्यांची राज्यात प्रतिमा आहे. कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंडे सतत भ्रष्टाचार विरोधात लढा देत असल्याने रावप्रकरणी ते पुन्हा चौकशीचे आदेश देणार की रावप्रकरणी कानाडोळा करून राव यांची पाठराखण करतात याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहीले आहे.