४८ लाखाचे २०४६ तिकिट जप्त
मुंबई : ई तिकिट प्रकरणी कारवाईचा फास आवळताना पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने आपली मोहीम यावर्षी अधिक गतीमान केली आहे. मागील चार महिन्यामध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने १११ ठिकांनी छापे मारत १२१ दलालांना अटक केली आहे आणि रेल्वे कायद्याअंर्तगत १४३ अन्वये त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागिय सुरक्षा आयुक्त आनंद झा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत लांबवरचा प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या तिकीटांचे आरक्षण मिळत नाही. याचाच फायदा उचलत दलाल मंडळी प्रवाशांना तिकिट उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात पाहिजे त्या प्रमाणात पैसे उकळत आहेत. यातून तिकिटांचा काळाबाजार फोफावला आहे. दलालांवर कारवाई झाल्यामुळे तिकिटांच्या काळाबाजाराला मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे. रेल्वे सुरक्षा दलाची पथके काळाबाजार करणाऱ्यांचा शोध घेत असल्याची माहिती आनंद झा यांनी दिली.
मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये आरक्षित तिकिट देण्याकरता दलाल तिकिट खिडक्यांएवजी ई तिकिटचा वापर अधिक करतात. ऑनलाईन तिकिट देण्याकरता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बोगस प्रमाणपत्र बनवून मोठ्या प्रमाणावर तिकिटांचे आरक्षण करण्यात येत आहे. झा यांनी याबाबत सांगितले की, या कामामध्ये बोगस दलालांसोबत अधिकृत एजंटही सक्रिय आहेत. हे एजंटही प्रवाशांकडून अधिक पैसे उकळून प्रवाशांना तिकिट देत आहेत.
मार्च २०१५-१६ मध्ये पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने २२८ जागांवर छापे मारताना जवळपास एक कोटी दहा लाख रूपयांच्या ई-तिकिट जप्त करत २८० दलालांना अटक केली आहे. सन २०१४-१५ या वर्षात रेल्वे सुरक्षा दलाने ४७ गुन्हे दाखल करताना ५८ दलालांना अटक केली होती.२५ लाख ६६ हजार रूपयांच्या १४६३ ई तिकिट जप्त केल्या होत्या.
प्रत्येक महिन्यात जोरदार मोहीम उघडूनही ई-तिकीटचा काळाबाजार करणाऱ्यांचे जाळे वाढतच चालले आहे. आकडेवारीवर नजर टाकली असता याचे जाळे दूरवर पसरल्याचा अंदाजही लावणे अवघड आहे. आताही चार ते पाच पथके ई-तिकिटप्रकरणी दलालांवर नजर ठेवून आहे आणि काळाबाजार रोखण्याचा प्रयास करत आहेत.
आनंद विजय झा
विभागिय सुरक्षा आयुक्त, पश्चिम रेल्वे
रेल्वे सुरक्षा दल
ई-तिकीटची प्रकरणे
महिना प्रकरणे दलाल तिकिट एकूण रक्कम
जानेवारी २७ ३० ४३३ ९,५९,८८२ रू.
फेब्रुवारी २१ २२ ४८९ १२,०२,९७८ रू.
मार्च ३० ३६ ५९० १३,५७,२८० रू.
एप्रिल ३३ ३६ ५३४ १२,६३,३३१ रू.
एकूण १११ १२१ २०४६ ४७,८३,४७१ रू.