नवी मुंबई : प्रत्येक भाजपा कार्यकर्ता आणि पदाधिकारीसोबत माझी सर्व ताकद असेल, त्यामुळे कोणीही स्वतःला एकटे समजू नये अशी सिंहगर्जना नवी मुंबई भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केली. वाशी येथे भाजपा कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी श्री. घरत बोलत होते. याप्रसंगी, व्यासपीठावर नवी मुंबई भाजपा प्रभारी संजय उपाध्येय, आमदार मंदाताई म्हात्रे, शिक्षण सम्राट डॉ. राजेश पाटील, नगरसेवक दिपक पवार, माजी नगरसेविका विजया घरत, विकास झंजाड, संपत शेवाळे, मारुती भोईर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदी नगरसेवक तथा महापालिकेतील गटनेते रामचंद्र घरत यांची नियुक्ती झाली आहे. ह्या जिल्हाध्यक्ष नियुक्तीचे औचित्य साधून नवी मुंबई भाजपा, भाजपा युवा मोर्चा, भाजपा महिला आघाडी व संलग्न संघटनांच्या माध्यमातून नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांचा नागरी सत्कार सोहळा वाशी येथील देवज्ञ सभागृहात आयोजित केला होता. ह्या सत्कार सोहळ्याला संबोधित करताना, श्री. घरत यांनी यापुढे शहरातील प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्याने न डगमगता पक्ष बांधणीत आणि लोकसेवेत निस्वार्थपणे स्वतःला झोकूण द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तर, यापुढे प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यासोबत मी आणि माझी सर्व ताकद असेल याची ग्वाहीही श्री. घरत यांनी उपस्थितांना दिली. तसेच, पक्ष बांधणीसोबतच केंद्र व राज्य शासनाच्या समाजउन्नतीच्या योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवणार असल्याचेही श्री. घरत यांनी आपल्या भाषणात सांगितले. “पक्ष संघटना बांधणीतील एक अनुभवी कार्यकर्ता जिल्हाध्यक्ष म्हणून रामचंद्र घरत यांच्या रूपाने शहराला लाभला असल्याने, येणाऱ्या काळात शहरातील प्रत्येक वार्डात भाजपाचा झेंडा डौलाने फडकणार” असल्याचे मत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मांडले. तर, आमदार मंदाताई म्हात्रे ह्या सिंहणी असून त्यांच्या मार्गदर्शनातून पुढे वाटचाल करणाऱ्या रामचंद्र घरत ह्या सिंहाला माझ्या शुभेच्छा असून, त्यांनी नवी मुंबई महापालिकेत भाजपाचा महापौर विराजमान करावा अशी इच्छा शहर प्रभारी संजय उपाध्येय यांनी व्यक्त केली.