वाशी : सर्वश्रेष्ठ होणे म्हणजे वेतनवाढ, त्यामुळे आपल्या पतसंस्थेला सहकार क्षेत्रात उच्च स्थानावर सकारात्मक पद्धतीने पोहचविणे आणि त्यासाठी परिश्रम घेणे हे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगत, कर्मचारी वृंदासाठी करण्यात आलेली वेतनवाढ त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरणार असल्याचे वक्तव्य श्री कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष तथा आमदार शरद सोनवणे यांनी केले. ते सोसायटीच्या वाशी येथील मुख्य कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते.
सहकारातून समाजपरिवर्तन ह्या ब्रीदवाक्यानिशी सहकार क्षेत्रात यशस्वीरीत्या वाटचाल करणाऱ्या श्री कुलस्वामी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने आपल्या एकूण 22 शाखेतील 212 कर्मचा-यांसाठी सुमारे पंधरा टक्क्यांची वेतनवाढ केली असून, सदर त्रैवार्षिक वेतनवाढ करारनाम्यावर सोसायटीचे अध्यक्ष तथा आमदार शरददादा सोनवणे आणि उपाध्यक्ष शंकरशेठ पिंगळे यांनी वाशी येथील सोसायटीच्या मुख्य शाखेतस्वाक्ष-या केल्या. याप्रसंगी, श्री कुलस्वामी सेवक संघ ह्या कर्मचारी युनिअनच्या पदाधिका-यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षांसाहित उपस्थित संचालकांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले व येत्या काळात संचालक मंडळाने अंतिम केलेले ध्येय गाठून आमची कार्यक्षमता सिद्ध करु अशी ग्वाही कर्मचारी वर्गाने यावेळी संचालक मंडळाला दिली.