धोकादायक इमारत कधीही कोसळण्याची शक्यता
शाळेच्या आवारातच डेब्रिजचे ढिगारे
अतिक्रमण कारवाईत अर्ध्या इमारतीवरच कारवाई
नवी मुंबई : सिडकोकडून करण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे सभोवतालच्या रहीवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. अतिक्रमणावर हातोडा चालविताना अर्धीच इमारत पाडून अर्धी तशीच ठेवल्याने कारवाईच्या पारदर्शकतेबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आठवडाभरापूर्वी कारवाई करूनही आज पालिकेच्या शाळेच्या आवारातच तोडलेल्या इमारतीचे डेब्रिज तसेच पडून आले. शाळा आता अवघ्या १०-१२ दिवसांनी सुरू होणार असल्याने ऐन पावसाळ्यात ती अर्धवट अवस्थेत असलेली धोकादायक इमारत पालिका शाळेतील मुलांच्या अंगावर कोसळण्याची भीती रहीवाशांकडून व शाळेतील विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
आठ दिवसापूर्वी सिडकोने सारसोळेतील महापालिका शाळा क्रं १२ नज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय शाळेच्या संरक्षक भिंतीलगत असलेल्या एका अनधिकृत इमारतीवर कारवाईचा हातोडा चालविला. तथापि हा हातोडा चालविताना चार मजली अनधिकृत इमारतीचा अर्धा भाग हटविण्यात आला. आजही इमारतीचा अर्धा भाग कारवाई अर्धवट सोडल्याने कायम आहे. सिडकोने नेरूळमध्ये अनेक अनधिकृत इमारतींवर कारवाई करताना अर्ध्या भागावर कारवाई करताना अर्धा भाग तसाच सोडल्याचे अनेक ठिकाणी पहावयास मिळते. कारवाईनंतर पुन्हा त्याच अर्ध्या भागावर बांधकाम होवून इमारतींमधील सदनिकांची विक्री झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. नेरूळ सेक्टर ६ परिसरात अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या अनधिकृत इमारतींवर याच स्वरूपात कारवाई झाली. त्यानंतर त्या ठिकाणी बांधकामे पूर्ण करून आज त्याच इमारतींच्या तळाला राजकीय पक्षांची कार्यालये पहावयास मिळत आहेत.
शाळेलगतची अनधिकृत इमारत तोडताना सिडकोने जेसीबी व अन्य साहीत्य पालिका शाळेतूनच नेले. पालिका शाळेतील मागील बाजूस असणाऱ्या छोटेखानी प्रवेशद्वारालगतच्या परिसराचे नुकसान झाले आहे. या कारवाईत काही ठिकाणी पालिका शाळेच्या संरक्षक भिंतीलाही तडे गेले आहेत. लोखंडी ग्रीलही मोठ्या प्रमाणावर तुटलेली आहे. शाळेची संरक्षक भिंतही तुटली गेली आहे. तोडलेल्या अनधिकृत इमारतीचे डेब्रिज आजही शाळेच्या आवारात तसेच पडलेले आहे. पावसाळा आता आठवड्यावर आला असून शाळाही लवकरच सुरू होणार आहे. पाऊसामध्ये ती अर्धवट पाडण्यात आलेली इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. ही इमारत पालिका शाळेच्याच आवारात कोसळण्याची शक्यता असल्याने पालिका शाळेतील मुलांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार कायम आहे. शाळेच्या मागील बाजूस असलेल्या छोटेखानी प्रवेशद्वाराकडून गावातील मुले व अन्य भागातील मुले शाळेमध्ये ये-जा करत असतात. या कारवाईत पालिका शाळेतील संरक्षक भिंतीचे, लोखंडी ग्रीलचे, पेव्हर ब्लॉकचे नुकसान झाले असून डेब्रिजचे ढिगारेही तसेच पडून आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वीच ती इमारत पूर्णपणे जमिनदोस्त न केल्यास पावसाळ्यात जिवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
(साभार : दै. नवराष्ट्र)