पालिका आयुक्तांचे इंटक नवी मुंबई अध्यक्षांना आश्वासन
नवी मुंबई : महानगरपालिका प्रशासनात काम करणारे कामगार हे माझे असून यापुढे त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. कामगारांची पदोन्नती तसेच अन्य प्रलंबित समस्यांचेही लवकरच निवारण केले जाईल असे आश्वासन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांना दिले.
महापालिका प्रशासनात काम करणार्या कामगारांच्या समस्यांबाबत व कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी आयुक्त मुंढे यांची भेट घेवून पालिका प्रशासनात वर्षानुवर्षे काम करणार्या कर्मचारी व अधिकार्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबतचे निवेदन सादर करत त्यावर चर्चा केली.
आयुक्तांबाबत चर्चा सकारात्मक झाली असून कामगारांच्या समस्या आयुक्त लवकरच मार्गी लावतील असा विश्वास व्यक्त करून आयुक्त हे कामगारहितैषी असल्याने यापुढे कामगारांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याची आवश्यकता भासणार नसल्याचा आशावाद यावेळी रवींद्र सावंत यांनी बोलून दाखविला आहे.
प्रशासन विभाग, आरोग्य विभागासह अन्य विभागातील अनागोंदी कारभार, पदोन्नतीबाबत झालेला अन्याय, वर्षानुवर्षे एकाच पदावर काम करणार्यांचा मनमानीपणा यासह कामगार व अधिकार्यांच्या समस्यांचा रवींद्र सावंत यांनी निवेदनामध्ये उहापोह केला आहे.