या मार्गावर नेमका काय बिघाड झाला आहे अद्याप समजू शकलेले नाही. फास्ट ट्रॅकवरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत असून स्लो ट्रॅकवरील लोकल तब्बल अर्धा तास ते ४० मिनिटे उशीराने धावत आहेत. रेल्वेच्या या खोळंब्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे स्थानंकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. सुदैवाने मध्य रेल्वेच्या स्थानकांवर उद्घोषणा करून या बिघाडाची माहिती दिली जात असल्याने काही प्रवासी रेल्वेऐवजी इतर वाहनांचा वापर करून ऑफीसच्या दिशेने रवाना झाले आहेत.
बुधवारी रात्री प्रथम शीव स्थानकाजवळील चारही मार्गांवरील ओव्हरहेड वायरमध्ये रात्री ८.0६ च्या सुमारास बिघाड झाला आणि लोकल वाहतूक खोळंबली. त्यामुळे सीएसटीकडे जाणाऱ्या आणि सीएसटीहून सुटणाऱ्या लोकल जागीच थांबल्या. याचबरोबरच प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असलेल्या एका लोकलच्या पेन्टाग्राफमध्येही तांत्रिक समस्या उद्भवली आणि या गोंधळात आणखी भर पडली. त्यानंतर विक्रोळी स्थानकाजवळ रात्री सव्वा आठच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. हा बिघाड सहा मार्गांवर झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे पुरते तीन तेरा वाजले. मेल-एक्सप्रेस गाड्या हळूहळू सुरु करण्यात आल्यानंतर लोकलच्या अन्य चारही मार्गांवरील लोकल सेवा ठप्पच झाली होती. जवळपास एक तासांपेक्षा जास्त वेळ झाल्यानंतरही लोकल पुढे सरकत नसल्याने प्रवाशांनी रुळावरून चालणे पसंत केले. काही स्थानकांवर तांत्रिक बिघाडाची माहिती देत असल्याने आणि लोकल तासनतास पुढे सरकत नसल्याने प्रवाशांनी टॅक्सी, रिक्षांचा पर्याय निवडला. मस्जिद ते दादर स्थानकापर्यंत एकही लोकल येत नसल्याने या स्थानकांवर हजारो प्रवाशांची गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत हीच परिस्थिती सर्व स्थानकांवर होती. शीव येथील बिघाड रात्री ८.४० च्या सुमारास दुरुस्त करण्यात आले. विक्रोळी येथील सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.