नवी मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यापासून कार्यालयीन प्रणालीत नेटकेपणा आणण्याकडे कटाक्षाने लक्ष देणा-या महापालिका आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांनी आता नवी मुंबई शहराविषयी जनतेच्या भावना जाणून घेण्याकडे लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले असून प्रत्येक आठवड्यात एक दिवस ते सर्व विभाग प्रमुखांसह लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र जमतात अशा उद्याने, मॉर्निंग वॉकच्या जागा याप्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या थेट भेटी घेऊन सुसंवाद साधणार आहेत.
वॉक विथ कमिशनर या अभिनव उपक्रमाव्दारे रविवार दि. 29 मे 2016 रोजी सकाळी 7.00 वा. से. 15 सी.बी.डी. बेलापूर येथील सागर विहार जॉगिंग ट्रॅक याठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकला येणा-या नवी मुंबईकर नागरिकांशी ते थेट संवाद साधणार असून यामध्ये जनतेच्यामहापालिेकेकडून असलेल्या अपेक्षा व संकल्पना जाणून घेतल्या जाणार आहेत. यावेळी नागरिक महापालिका आयुक्तांना थेट भेटून त्यांच्याशी संवाद साधू शकतात.
नागरिकांनी कार्यालयात येऊन माझी भेट घेण्यापेक्षा मीच त्यांच्यापाशी जाऊन त्यांचे म्हणणे जाणून घेणे मला अधिक योग्य वाटते अशी भूमिका मांडत महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी “वॉक विथ कमिशनर” मधून जनतेच्या सूचना / संकल्पना जाणून घेऊन आधुनिक व स्मार्ट शहर निर्मितीकडे लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नवी मुंबईकर नागरिकांसमवेत सहकारी अधिका-यांसह सुसंवाद साधल्याने नवी मुंबई शहराच्या विकासाला लोकाभिमुख गती येईल असे स्पष्ट करीत “वॉक विथ कमिशनर” या अभिनव उपक्रमाला नवी मुंबईकर नागरिक चांगला प्रतिसाद देतील असा विश्वास महापालिका आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला आहे.