लोकाभिमुख प्रशासन नजरेसमोर ठेवून विविध गोष्टींमध्ये सुयोग्य बदल करण्याची भूमिका जपणा-या महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी जनतेच्या सोयीच्या दृष्टीने दैनंदिन साफसफाईच्या वेळांमध्येदेखील बदल सूचविला असून त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात आठ प्रशासकीय विभागांमध्ये दैनंदिन साफसफाईची कामे 91 भौगोलिक गटांच्या माध्यमातून कंत्राटी पध्दतीने पार पाडली जातात. ही कामे सकाळी 7 वा. सुरु होत होती. तथापि जनतेच्या सोयीच्या दृष्टीने शहर साफसफाईला लवकर सुरुवात व्हावी व लोकांची वर्दळ सुरू होईपर्यंत सफाईची कामे मार्गी लागावीत यादृष्टीने सदरची कामे सकाळी 7 ऐवजी सकाळी 6 वा. सुरु व्हावीत असे महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार ही कामे सकाळी 6 वा. सुरु करण्यात आली आहेत.
तसेच परिमंडळ 1 व 2 मधील काही निवडक रस्त्यांवर सकाळी 7 वा. सुरु होणारी यांत्रिक सफाईची कामे आता सकाळी 5 वाजता सुरु करण्यात आलेली आहेत. तसेच परिमंडळ निहाय नियुक्त केलेल्या उपद्व शोध पथकाच्या वेळेत बदल करण्यात येऊन दोन्ही परिमंडळातील पथके सकाळी 5 ते दुपारी 1 आणि दुपारी 1 ते रात्री 9 या दोन सत्रात कार्यरत आहेत.
दैनंदिन साफसफाई व यांत्रिक रस्ते सफाई आणि उपद्रव शोध पथके यांच्या कामांच्या वेळेमध्ये जनतेच्या सोयीसाठी बदल करण्यात आला असून दैनंदिन साफसफाई करणा-या कंत्राटदारांच्या एजन्सीची नावे त्यांच्या कामाच्या कार्यक्षेत्रासह नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ (Website) www.nmmconline.com यावर जनतेच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आलेली आहेत.
त्याचप्रमाणे दैनंदिन साफसफाई व कचरा वाहतुकीच्या कामाबाबत नागरिकांना काही तक्रारी / सूचना दाखल करावयाच्या झाल्यास सध्याचे सोशल मिडिया वापराचे लक्षणीय प्रमाण लक्षात घेऊन 9769894944 हा व्हॉटस् ॲप क्रमांक घनकचरा व्यवस्थापन विभागाने सुलभ संपर्कासाठी उपलब्ध करुन दिला आहे. त्यावर प्राप्त तक्रारींची दखल घेऊन त्याचे विहित वेळेत निराकरण करण्यात येत असून त्याची माहिती पुर्नसंदेशाव्दारे संबंधितांस व्हॉटस् ॲप वरून कळविण्यात येत आहे.
दैनंदिन स्वच्छतेकरीता नागरिकांना सोयीच्या ठरतील अशा वेळा महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार दैनंदिन सफाईसाठी कार्यान्वित केल्याने तसेच स्वच्छतेबाबत तक्रारी / सूचना करण्यासाठी व्हॉटस् ॲप सारखा लोकप्रिय पर्याय उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.