मुंबई – : शिवसेनेच्या शिववड्याला टक्कर देण्यासाठी भाजप नमो टी स्टॉल घेऊन येणार अशी चर्चा रंगली होती. पण, नमो टी स्टॉल येणार पण ती भाजपची भूमिका नाही असं स्पष्टीकरण भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिलंय.
शिवसेनेच्या शिव वडापावनंतर आता भाजपचे नमो टी स्टॉल दिसण्याची शक्यता निर्माण झालीये. हे नमो टी स्टॉल आणि फूड स्टॉल सुरु करण्याचा निर्णयाला गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आलाय. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून बेरोजगारांना बँकेकडून कर्ज मिळवून देण्याची तरतुद देणार असल्याचं या प्रस्तावात म्हटलंय.
पालिकेनं या टी स्टॉलला परवाने देऊन त्यांच्याकडून अधिकृतरित्या भाडं आकारावं असं ही या प्रस्तावात नमूद करण्यात आलं आहे. पण या नमो टी स्टॉल आणि फूड स्टॉलमुळे बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि स्वच्छ पदार्थ मुंबईकरांना मिळेल असं मत सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरेंनी व्यक्त केलंय.
पण मुंबईचे भाजप प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेवून ही पक्षाची अधिकृत भूमिका नसून प्रकाश गंगाधरे यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या काळात देशभरात ठिकठिकाणी चाय पे चर्चा घडवून आणली. त्यावेळी नमो टी स्टॉल उभारण्यात आले होते.
कसा असेल नमो टी स्टॉल ?
– अधिकृत हॉकर्स झोनमध्ये टी स्टॉल लावला जाईल
– टी स्टॉल धारकाला पालिकेचा अधिकृत परवाना असेल
– मुद्रा बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज मिळेल
– स्टॉलची किंमतही कर्जाच्या रकमेतून वळती केली जाईल
– सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही योजना सुरू करण्यात येईल