वर्धा – : वर्ध्यातील पूलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारात स्फोट झाल्यामुळे लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झालाय.
या दुर्घटनेत 15 जवान आणि 2 लष्करी अधिकार्यांचा समावेश आहे. 19 जण यात जखमी झाले आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
भारतीय लष्कराच्या पूलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारात आज पहाटे 2 ते 2.30 त्या सुमारास स्फोट झाला. स्फोटामुळे आग पसरली. या आगीची तीव्रता इतकी होती की, याच्या झळा आजुबाजूच्या गावांना जाणवत होत्या. स्फोटामुळे परिसरातील घरांच्या काचा फुटल्या. घटनास्थळी आणखी स्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे खबरदारी म्हणून आजूबाजूच्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. या स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळी भेट देणार आहे.