विधान परिषद निवडणूक : ठाणे
नवी मुंबई : ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीतील चुरस वाढीला लागली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने व कॉंग्रेसने वसंत डावखरेंकरता तर शिवसेना-भाजपाने रविंद्र फाटक यांच्याकरता प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या मतदारसंघात नवी मुंबई कार्यक्षेत्रातील १११ मतांकडे ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या मतांमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून भाजपाच्या व कॉंग्रेसच्या मतांकडेही संशयाने पाहिले जात आहे.
एप्रिल २०१५ ला झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीत ३८ नगरसेवक निवडून आले आहेत. सभागृहात शिवसेनेचे दोन स्वीकृत नगरसेवक आहेत. भाजपाचे ६ नगरसेवक आहेत. मागील निवडणूकीच्या तुलनेत शिवसेनेचे नवी मुंबईतील संख्याबळ वाढले आहे. मागील विधान परिषद निवडणूकीत शेवटच्या क्षणी शिवसेनेने उमेदवार निवडणूक रिंगणात न उतरविल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वसंत डावकरेंच्या विजयाला अडथळे निर्माण झाले नाहीत. मागील निवडणूकीच्या तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तुलनेत शिवसेनेचे संख्याबळ वाढलेले आहे. शिवसेना-भाजपाकडे नवी मुंबईतून ४६ नगरसेवकांचे संख्याबळ असले तरी शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांशी वसंत डावखरेंशी व्यक्तिगत स्नेह असल्याने ते नगरसेवक फाटकांऐवजी डावखरेंना सहकार्य करण्याचा विश्वास डावखरे समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. डावखरेंच्या विजयासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ग्रामीण भागातील काही आमदारांनी आपल्या भागातील शिवसेना नगरसेवकांशी संपर्क करत डावखरेंना सहकार्य मिळेल का, याची चाचपणी सुरू केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीच्या मतांची बेरीज नवी मुंबईत ७० होत असली तरी नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभापती निवडणूकीत झालेला दगाफटका लक्षात घेता कॉंग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसला मतदान करणार का शिवसेनेला सहकार्य करणार, याबाबत उलटसूलट चर्चा सुरू आहे. महापालिका निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील मातब्बर शिवसेनेत गेल्याने त्या मातब्बरांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नगरसेवकांशी संपर्क करत शिवसेनेला मतदान करण्याविषयी साकडे घालण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसची ७० वा त्यापेक्षा अधिक मते डावखरेंना मिळावीत याकरता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक,आमदार संदीप नाईक प्रयत्न करत असून याबाबत नगरसेवकांच्या त्यांनी मार्गदर्शनपर बैठकाही घेतल्या आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये स्थायी समिती सभापती निवडीवरून झालेली कटूता लक्षात घेता शिवसेनेने कॉंग्रेसच्या नगरसेवकांशीही संपर्क करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या ती पक्षाच्या नगरसेवकांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात असल्याने मतांमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.