* आमदार संदीप नाईक यांनी केला पर्दाफाश
* धान्याच्या गोदामांना दिली अचानक भेट
नवी मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारतर्फे दिले जाणारे रेशनिंगचे धान्य कशा प्रकारे दर्जाहीन आणि सडलेल्या अवस्थेत आहे. त्याचा पर्दाफाश आमदार संदीप नाईक यांनी तुर्भे येथील केंद्रीय वखार मंडळाच्या गोदामांना अचानक दिलेल्या भेटी दरम्यान झाला आहे.
आमदार संदीप नाईक हे शिधावाटप दक्षता समितीचे उपाध्यक्ष आहेत. नागरिकांना रेशनिंगचे धान्य उत्तम प्रतीचे मिळाले पाहिजे यासाठी समितीच्या वेळोवेळी होणार्या बैठकांमधून सातत्याने ते पाठपुरावा करतात. त्याच प्रमाणे या धान्याचे नमुने देखील तपासत असतात. समितीच्या अलीकडे झालेल्या बैठकांममध्ये रेशनिंगच्या धान्याचा दर्जा चांगला नसल्याचे त्यांनी नमूदही केले होते. आज आमदार नाईक यांनी अचानक केंद्रीय वखार मंडळाच्या गोदामांना भेट दिली. त्यावेळेस त्यांनी केलेल्या पाहणीमध्ये गहू आणि तांदूळ निकृष्ट दर्जाचा असल्याचे निदर्शनास आले. त्याच बरोबर या धान्यात खडे मोठ्या प्रमाणात होते. धान्याला किड देखील लागल्याचे दिसून आले. धान्याच्या पोत्यांमधून किडे बाहेर पडत होते. हा सर्व धक्कादायक प्रकार पाहिल्यानंतर आमदार संदीप नाईक यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया नोंदवत हा विषय विधानसभेत मांडणार असल्याचे सांगितले. या विरोधात राज्याचे अन्न पुरवठा मंत्री आणि या खात्याचे प्रधान सचिव यांची भेट देखील घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एकिकडे महागाईचा आगडोंब उसळला असताना सर्व सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी रेशनिंगच्या अन्न धान्यावर अवलंबून राहावे लागते. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा रेशनिंगच्या दुकानांमध्ये आहे. मागणीनुसार पुरवठा होत नाही. या पार्श्वभूमीवर रेशनिंगच्या दुकानांमधून चांगल्या प्रतीचे धान्य नागरिकांना मिळेल याची काळजी सरकारने घेतली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून वितरित होणारे धान्य खरेदी कारण्यापासून ते त्याचा साठा करणे, रेशनिंगच्या दुकानात त्याचा पुरवठा करणे त्याचप्रमाणे रेशनिंग दुकानांमधून हे धान्य शिधापत्रिका धारकांना देणे या सर्व पातळ्यांवर धान्याची गुणवत्ता तपासलीच गेली पाहिजे. अशी मागणी आमदार संदीप नाईक यांनी केली आहे. गोदामांना अचानक दिलेल्या भेटींप्रसंगी आमदार संदीप नाईक यांच्या समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष अनंत सुतार, महिला जिल्हाअध्यक्षा माधुरी सुतार, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.