सभापती शिवराम पाटलांचा घणाघाती हल्लाबोल
नवी मुंबई ः दिवाळे गावातील स्मशानभूमीची दहन शेड तुटली आहे. आग्रोळी गावातील स्मशानभूमीचे टेंडर मंजूर होऊनही प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. घणसोली नोड मध्ये स्मशानभूमी नसल्याने पार्थिव अंत्यसंस्कारासाठी दोन-दोन किलोमीटर दूर न्यावे लागण्याची बाब आधुनिक नवी मुंबई शहरासाठी शोभनिय नाही. नवी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने निधन झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराशी राजकारण खेळू नये,असा घणाघात महापालिका स्थायी समिती सभापती शिवराम पाटील यांनी महापालिका सभागृहात केला.
‘महापालिका स्थायी समिती’च्या २२ जून रोजी झालेल्या सभेत सानपाडा येथील स्मशानभूमीच्या सुशोभिकरणाचा प्रस्ताव पटलावर आला असता नगरसेवक एम. के. मढवी, प्रशांत पाटील, जगदीश गवते, नगरसेविका भारती कोळी, शुभांगी पाटील यांनी आपापल्या प्रभागातील स्मशानभूमीच्या दुरावस्थेच्या पाढा वाचला. त्यावर महापालिका स्थायी समिती सभापती
शिवराम पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सात वर्षांपूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्त विजय नाहटा यांनी नवी मुंबई शहरातील सर्वच स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यासाठी स्मशानभूमी व्हिजन तयार केले होते.त्यावेळी सर्वच स्मशानभूमीचे चांगले सुशोभीकरण झाले होते. त्याच धर्तीवर प्रशासनाने तसाच नवीन कार्यक्रम हाती घ्यावा, अशी सूचना महापालिका स्थायी समिती शिवराम पाटील यांनी प्रशासनाला केली.
दरम्यान, ज्या स्मशानभूमी बाबत तक्रारी आहेत त्या स्मशानभूमींची तातडीने डागडुजी केली जाईल, असे आश्वासन महापालिका अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी सभागृहाला दिले.