लोकनेते गणेश नाईक यांच्या टीकेची विरोधकांवर कडाडली वीज
बरसणार्या पावसात विचार ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी
नवी मुंबई : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांची लाट होती.मात्र नवी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही लाटेचा परिणाम झाला नाही हे माझ्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले असून विरोधक कितीही एकत्र झाले तरी राष्ट्रवादीला नेस्तनाभूत करु शकत नाही हे पालिकेच्या पोटनिवडणुकीतील निकालावरुन स्पष्ट झाले आहे, अशी गर्जना लोकनेते गणेश नाईक यांनी केली आहे.नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने वृक्ष लागवड आणि वृक्ष वाटपाचा उपक्रम पावणे येथील क्वारी मैदान येथे पार पाडला.त्याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना लोकनेते नाईक यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. त्याचप्रमाणे पक्षाच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, ज्येष्ठ समाजसेवक ज्ञानेश्वर नाईक, माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, महापौर सुधाकर सोनावणे, युवकचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, महिला सेलच्या जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष दिनेश पारख त्याचबरोबर राष्ट्रवादीचे तालुका सेलचे अध्यक्ष, डॉक्टर सेल, मागासवर्गीय सेल, रेशनिंग कृती समिती, वॉर्ड स्तरीय कार्यकर्ते आणि महिला वर्ग आदी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.
अच्छे दिनचे आमिष दाखवून मोदी सत्तेवर आले मात्र जनतेच्या हिताची कामे या सरकारने केलीच नाहीत. केवळ भूलथापा दिल्या. राज्यातील फडणवीस सरकार देखील असे फेकू सरकार असल्याचा हल्लाबोल लोकनेते नाईक यांनी केला. नेरुळ आणि दिघा यादवनगर या दोन ठिकाणी झालेल्या महापालिकेच्या पोटनिवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा दणदणीत विजय झाला.पक्षाचे मताधिक्क्य देखील वाढले यावरुन राष्ट्रवादीने नवी मुंबईच्या मनात स्थान निर्माण केल्याचे सांगून पक्षाची ताकद अजूनही वाढल्याचे सांगितले.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश पातळीवर होणार्या बैठकांमध्ये नवी मुंबईचा नेहमीच गौरवपूर्ण उल्लेख होतो, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. नवी मुंबईतील हा एकनिष्ठ, समर्पित आणि कार्यतत्पर पक्ष असून या पुढच्या काळात जिल्हा, तालुका, वॉर्ड स्तरावर संघटनात्मक बांधणी मजबूत करुन तालुका स्तरावर बैठका घेण्यात येतील, कार्यकर्त्यांशी स्वत: संवाद साधणार आहे, अशी माहिती लोकनेते नाईक यांनी दिली.
दिघ्यातील बांधकामप्रकरणी बोलताना येथील जमिनी या स्थानिक भूमीपुत्रांच्या असून अधिकार्यांनी केलेले पाप यामुळे सर्व सामान्य नागरिक बेघर झाले आहेत, असे मत त्यांनी मांडले. दिघ्यातील पिडितांना न्याय मिळवून देण्याकरिता कायदेशीर लढाई यापुढे लढली जाईल. या निर्वासितांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना आर्थिक मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.दिघ्यातील आमच्या तीन नगरसेवकांना फोडण्याचे विरोधकांचे कारस्थान दिवा स्वप्नच बनून राहणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
केंद्राच्या स्मार्ट सिटी संकल्पनेच्या किती तरी अगोदर ही संकल्पना नवी मुंबईमध्ये मांडली आणि त्यानंतर सीबीडी सेक्टर-१५ येथे पायलट प्रोजेक्टही यशस्वी करुन दाखविला.जे केंद्राच्या स्मार्ट सिटीसाठी आग्रह धरीत आहेत त्यांनी हा पायलट प्रोजेक्ट नक्की बघावा, असे आवाहनही त्यांनी केले. नवी मुंबईच्या सुनियोजित विकासासाठी महापालिकेच्या माध्यमातून होर्डिंग आणि फेरीवाला पॉलिसी तयार करुन राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविलेल्या आहेत. परंतु फडणवीस सरकारने अजूनही या पॉलिसी मंजूर केल्या नाही, असा आरोप त्यांनी केला. वन टाईम प्लॉनिंगच्या माध्यमातून शहर विकासासाठी पाठपुरावा सुरु ठेवण्याचा मनोदय व्यक्त केला.
==स्थायी समिती सभापती निवडणुकी संदर्भात बोलताना निवडणुकी दरम्यान फडणवीस सरकारने हस्तक्षेप करुन दबंगगिरी केली. त्यांच्या या बेकायदा कृत्याला न्यायालयात आवाहन दिले असून त्यांना लवकरच चपराक मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.सन-२०१५ पर्यंतची घरे नियमित करण्याची घोषणा फडणवीस फेकू सरकारने केली मात्र होमवर्क कच्चा असल्याने कायदेशीर बाबीत हे सरकार न्यायालयात नेहमीच तोंडावर आपटते, या शब्दांत राज्य सरकारची लक्तरे काढली.
जिल्हयातील स्थानिक संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपविली आहे.नवी मुंबईप्रमाणे, ठाणे, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकविणार, असा विश्वास लोकनेते गणेश नाईक यांनी केला.
विद्यमान पालकमंत्र्यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी किती जनता दरबार घेतले आणि नवी मुंबईच्या कोणत्या समस्या सोडविल्या, या शब्दांत त्यांनी पालकमंत्र्यावर टीका केली.
नवी मुंबईची नवी कार्यकारिणी अत्यंत प्रभावशाली आहे.नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन यापुढे पक्ष वाढीसाठी प्रमुख पदाधिकार्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे असे सांगत तीन वर्षांनंतर होणार्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत चित्र बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करत कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण केला.