- नवी मुंबई : पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याऐवजी पालिका अतिक्रमण तोडण्यात मग्न असल्याने साफसफाईचा बोजवारा उडाला असल्याची टीका आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. पालिकेने पावसाळी शेडला परवानगी नाकारल्याच्या धोरणालाही विरोध दर्शविला असून, दुकानदारांचे नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
- पहिल्याच पावसामध्ये पालिकेचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. पावसाळापूर्व नालेसफाई व्यवस्थित झाली नसल्याने शहरात अनेक ठिकाणी रोडवर पाणी साचले आहे. सीबीडी सेक्टर ४, ५ व ६ मध्ये शनिवारी पाणी भरल्यामुळे नागरिकांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे धाव घेतली होती. नागरिकांनी हा प्रकार निदर्शनास आणून देताच म्हात्रे यांनी रविवारी सकाळी पाहणी दौऱ्याचे आयोजन केले. गटारांची साफसफाई झालेली नाही. अनेक ठिकाणी गाळ साचला आहे. गटारातील पाणी रोडवरून वाहत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सेक्टर ६ मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. येथील मीनाक्षी हॉटेलच्या बाजूला गटारावरील झाकण उघडे असल्याचे निदर्शनास आले. खड्ड्यात पडून नागरिक जखमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लहान मुलांचा जीव जाण्याची भीती असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले.
सीबीडी परिसरातील हॉटेल व इतर व्यावसायिकांनी मंदा म्हात्रे यांच्याकडे त्यांच्या व्यथा मांडल्या. आयुक्तांनी पावसाळी शेडला परवानगी नाकारली आहे. यामुळे पावसाचे पाणी दुकानामध्ये येत असून नुकसान होऊ लागल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी मंदा म्हात्रे यांनी पालिकेच्या कारभारावर सडकून टीका केली.
- ****
- साफसफाई करण्याऐवजी अतिक्रमण हटविण्यात प्रशासन मग्न झाल्याने नालेसफाईचा बोजवारा उडाला आहे. पावसाळी शेडला परवानगी नाकारल्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान होणार असून, पनवानगी न देण्याच्या धोरणाला आमचा तीव्र विरोध आहे.
- – मंदा म्हात्रे
आमदार, बेलापूर मतदारसंघ