नवी मुंबई: कोपरखैरणे, सेक्टर-१९ मध्ये राहणार्या दोघा तरुणांनी त्याच भागात राहणार्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या घरामध्ये नेऊन तिच्यासोबत अश्लिल आणि लैंगिक चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रविण रामराजे (३५) आणि रुपेश रामपालव (३३) अशी या तरुणांची नावे असून कोपरखैरणे पोलिसांनी या दोघांविरोधात विनयभंग तसेच पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
या प्रकरणातील १२ वर्षीय पिडीत मुलगी कोपरखैरणे भागात राहण्यास असून गत २५ जून रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पिडीत मुलगी कोपरखैरणेतील तलावाजवळ पावसामध्ये भिजत उभी होती. यावेळी सदर ठिकाणी आलेल्या प्रविणने तिला पावसामध्ये भिजू नकोस माझ्याबरोबर घरी चल असे सांगून तिला आपल्या घरी नेले. त्यानंतर प्रविण आणि त्याचा सहकारी रुपेश या दोघांनी पिडीत मुलीचे कपडे काढून तिच्यासोबत लैंगिक चाळे केले.
सदर प्रकारानंतर घाबरलेल्या पिडीत मुलीने या दोघांच्या तावडीतून सुटका करुन घेऊन आपल्या घरी पलायन केले. दरम्यान, कामानिमित्त बाहेर गेलेली पिडीत मुलीची आई २८ जून रोजी घरी परतल्यानंतर पिडीत मुलीने तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती तीला दिली. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने
कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ प्रविण रामराजे आणि रुपेश रामपालव या दोघांना अटक केली आहे.