युतीमधील दरी वाढत चालली
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या रे रोड येथील ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर भाजपाने बहिष्कार टाकला. महापालिकेचा कार्यक्रम असल्याने राजशिष्टाचार म्हणून उपमहापौर अलका केरकर कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. मात्र भाजपाचे मुंबई अध्यक्ष आ. आशीष शेलार यांनी आमंत्रण असूनही कार्यक्रमाला जाणे टाळले. दरम्यान, भाजपा कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून शिवसेनेच्या निषेधाच्या घोषणा दिल्याने दोन्ही पक्षांमधील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील स्मार्ट सिटी कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार घातला होता. त्या कार्यक्रमात शिवसेनेचा एकही नेता उपस्थित राहिला नाही. आता शिवसेनेने आयोजित केलेल्या मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमात भाजपने बहिष्कार घालून त्याची परतफेड केली आहे. त्यामुळे सेना-भाजपमध्ये बहिष्कार नाट्य रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपाने वर्षभर विरोधी पक्षाची भूमिका वठवत आपल्याच मित्रपक्षाला अनेकवेळा अडचणीत आणले़ नालेसफाई, रस्ते घोटाळे उघड केल्याचे श्रेय घेत भाजपाने शिवसेनेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले़. यामुळे शिवसेना भाजपा युतीमधील वाद चिघळत गेला़ महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर उभय पक्षांनी एकमेकांच्या कार्यक्रमात राडा करण्यास सुरुवात केली आहे़
शिवसेना-भाजपा युतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून ‘शोले’ भडकले आहेत. शाब्दिक युध्दानंतर आता हे दोन्ही मित्रपक्ष रस्त्यावर उतरून एकमेकांना आव्हान देत आहेत. शिवसैनिकांनी मंगळवारी सकाळी चर्चगेट रेल्वे स्टेशनसमोर आंदोलन करून आशीष शेलार यांची प्रतिमा जाळली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा‘शोले’तील ‘गब्बर’ तर प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांचा ‘गब्बर’चा ‘सांभा’ असा उल्लेख असलेले पोस्टर या आंदोलनात झळकवण्यात आले होते. त्यानंतर भाजपाचे प्रदेश सरचिटणिस सुजीत सिंह ठाकूर यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भाजप ‘जशास तसे’ उत्तर देईल, असा इशारा दिला होता. या सर्वांचे पडसाद बुधवारच्या पालिकेच्या कार्यक्रमावर दिसून आले.
भाजपाने केवळ उपमहापौरांना धाडून या कार्यक्रमावर संघटनात्मक पातळीवर बहिष्कार टाकला. त्यावर उध्दव ठाकरे काय बोलतात, याची उत्सुकता सगळ्यांना होती. मात्र त्यांनी वाद न वाढविता ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या उभारणीत भाजपाकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल आभारच मानले. भाजपाच्या पावित्र्यामुळे शिवसेनेनेही मवाळ भूमिका घेत भाजपाविरोधात थेट भाष्य करणे टाळले़
दरम्यान, या कार्यक्रमाकडे आशीष शेलार यांनी पाठ फिरवली. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी एक मोर्चा काढून शिवसेनेच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. याबाबत शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना पत्रकारांनी विचारले असता, भाजपाचा मोर्चा आम्ही पाहिलेला नाही. मोर्चा पाच किलोमीटर दूर काढला असेल तर आम्हाला माहित नाही,असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनपेक्षितपणे संयमी भूमिका घेत भाजपला समजुतीचा सल्लाही दिला. उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की,
चुकते तिथे टीका झालीच पाहिजे..
“जिथे चुकते तिथे टीका झालीच पाहिजे. मात्र चांगल्या कामाचे कौतुकही करायला हवे. मुंबई महापालिकेवर किती ताण आहे, हेही लक्षात ठेवा. आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप आपली रणनीती आखत असून मुंबईच्या प्रश्नावर भाजप सेनेला लक्ष करताना दिसत आहे. यावर ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेचा भाजपाला अप्रत्यक्ष टोला
पंपिंग स्टेशनच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांसह भाजपाला अप्रत्यक्ष टोला लगावला़ मुंबईत विकासाच्या नावाखाली चटईक्षेत्र निर्देशांक वाढविण्यासाठी दबाव टाकला जात आहे़ मात्र पायाभूत सुविधांचे नियोजन व त्याच्या उभारणीचा खर्च उचलण्यासाठी कोणी पुढे येत नाही, असा टोला ठाकरे यांनी लगावला़ स्मार्ट सिटी प्रकल्पातून केंद्राने मुंबईला वगळण्याने ठाकरे यांनी हा निशाणा साधला़
थोडी सबुरी ठेवा़
नालेसफाईचे काम असमाधानकारक असल्याने मुंबईत पाणी तुंबणार, अशी शक्यता भाजपाने वर्तविली होती़ मात्र काही लोकांना धीर धरता येत नाही़ त्याआधीच त्यांची टिकाटिपणी सुरु होते़ मोठा पाऊस पडूनही कुठे पाणी तुंबले नाही, असा दावा करीत ठाकरे यांनी भाजपाला अप्रत्यक्ष सुनावले़ मात्र पंपिंग स्टेशनचे थोडे श्रेय भाजपालाही शिवसेनेने आवर्जून देत समतोल ठेवला़
बहिष्कार नव्हे निषेध
भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांचा अपमान शिवसैनिकांनी केल्यामुळे त्यांच्याबरोबर एका व्यासपीठावर बसणे आता शक्य नाही़, अशी भूमिका घेत भाजपाचे मुंबई अध्यक्ष शेलार उद्घाटन कार्यक्रमात गैरहजर राहिले़ मात्र हा बहिष्कार नसून निषेध असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे़