रत्नाकर गायकवाडांचा घणाघाती आरोप
मुंबई : दादरमधील आंबेडकर भवन हे बाबासाहेबांना सामाजिक केंद्र बनवायचे होते. मात्र प्रकाश, आनंदराज आणि भीमराव आंबेडकर या तीन भावांनी तिथे गुंडांचा अड्डा बनवला होता, असा घणाघाती आरोप माहिती आयुक्त आणि पिपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे सल्लागार रत्नाकर गायकवाड यांनी केला आहे.
दादर येथील ‘आंबेडकर भवन’ची इमारत पाडल्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंबिय व पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टमध्ये वाद पेटला आहे. आंबेडकर कुटुंबियांनी संबंधित ट्रस्टीवर गुन्हे दाखल केले असून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. या मागणीसाठी मंगळवारी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेवून आंबेडकरांचे नातू प्रकाश, आनंदराज व भीमराव यांच्यावर तोफ डागली. डॉ. आंबेडकर भवनावर या तिघांनी कब्जा केला होता. आंबेडकर बंधूंना दादरचा प्लॉट बळकावयचा होता. ते भवन चळवळीचे केंद्र राहिले नव्हते, तर तो गुंडांचा अड्डा झाला होता, असे गायकवाड म्हणाले. ‘ट्रस्टींना येथे १७ मजली इमारत बांधून बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. ट्रस्टींनी हा निर्णय घेतल्यानेच आंबेडकर बंधूंच्या पोटात दुखत आहे, पन जीव गेला तरी चालेल हे स्वप्न आम्ही पूर्ण करणारच,’ असा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला.
· भाडे न देणारे भाडेकरू कसे?…
आंबेडकर भवन गुपचूप पाडल्याचा आरोपही गायकवाड यांनी फेटाळून लावला. ‘आम्ही भवन गुपचूप पाडलेले नाही. त्याबाबत नियमानुसार वर्तमानपत्रात जाहिरातही दिली होती. महापालिकेने भवनची इमारत धोकादायक असल्याची नोटिसही दिली होती. त्यामुळे ती वास्तू पाडणे ट्रस्टींचे कर्तव्य होते.मात्र, ती पाडण्यास आंबेडकर बंधूंचा विरोध होता. या तिघांनी तिथे बेकायदा कार्यालये थाटली होती. या नेत्यांनी आजपर्यत एक रूपायाही भाडे दिलेले नाही. मग ते भाडेकरू कसे ठरतात,’ असा सवालही गायकवाड यांनी उपस्थित केला.
· कोणाला अध्यक्षपद तर कोणाला मालकी हवी…
पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टने याप्रकरणी अनेकदा तोडग्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकाश आंबेडकर यांना ट्रस्टीचे अध्यक्षपद हवे आहे, तर इतर दोघा बंधूंना नव्या इमारतीत एक एक मजला मालकी हक्काने हवा आहे. त्याला नकार देवून ट्रस्टींमध्ये आंबेडकर कुटूंबियांना घेवू नये हे बाबासाहेबांचे धोरण आम्ही पुढे चालवत आहोत, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.
· उद्या हे राज्यघटनेवरही हक्क सांगतील…
हे तिघे बंधू बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या प्रत्येक संस्थेवर आणि वास्तूवर हक्क सांगत आहे, असे सांगतानाच ‘उद्या हे आमच्या आजोबांनी देशाची राज्यघटना लिहिली आहे म्हणून राज्यघटनेवरही हक्क सांगतील,’ असा टोला गायकवाड यांनी लगावला.