मुंबई : लोकलच्या टपावर स्टंटबाजी करणाऱ्या टपोरींना जरब बसावी म्हणून रेल्वे पोलिसांनी अनेकदा धडक कारवाई केली असली तरी असे स्टंटबाजीचे प्रकार काही थांबलेले नाहीत. अशाच एका स्टंटबाजाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडियावर व्हायरल झाला असून हा तरूण कोण? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
पश्चिम वा मध्य रेल्वे मार्गावर हा व्हिडिओ शूट करण्यात आल्याचा अंदाज आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या रेल्वेच्या टपावर हा टपोरी उभा आहे. जीवावर उदार होवून तो ओव्हरहेड वायरला चकवा देत आहे, असे भयंकर दृश्य या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ यूट्यूब तसेच अनेक फेसबुक ग्रुपवर अपलोड करण्यात आला असून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या स्टंटबाजाला पकडून अद्दल घडवा, अशी मागणीही या माध्यमातून होत असून हा व्हिडिओ मुंब्रा खाडी परिसरातील असावा, असा नेटिझन्सचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गंभीर दखल घेवून तातडीने या स्टंटबाजाचा शोध सुरू केला आहे.
हा व्हिडिओ समांतर धावणाऱ्या एकाद्या लोकलमधून शूट करण्यात आल्याची शक्यता आहे. व्हिडिओत खाडी दिसत असली तरी दृश्य अस्पष्ट असल्याने हे ठिकाण कोणते आहे, याचा उलगडा होत नाही, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोडे यांनी सांगितले. पश्चिम रेल्वे मार्ग पोलिसांनीही या व्हिडिओची पडताळणी करून शोध सुरू केला आहे. हा व्हिडिओ भाईंदर खाडी परिसरात शूट करण्यात आला आहे का, याचा तपास आम्ही करत आहोत, असे वसई जीआरपीचे वरिष्ठ निरिक्षक महेश बागवे यांनी सांगितले.
सर्वच लोकलवरील जाहिरातींची नोंदणी केलेली असते. त्याद्वारे ही लोकल कोणत्या मार्गावरील आहे, हे कळण्यास पोलिसांना मदत होण्याची शक्यता आहे. शिवाय हा व्हिडिओ ज्या व्यक्तींने शूट केला आहे, त्या व्यक्तीशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.