नवी मुंबई : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. मनपाने वृक्षारोपणाचे आवाहन केले असले तरी रहीवाशांकडे वृक्षारोपणासाठी जागा शिल्लक नाही. मनपाने जुईनगर सेक्टर 24 येथे स्मशानभूमीलगत असलेला ट्री-बेल्टचा भुखंड हस्तांतरीत होवून अनेक वर्षे काहीही केलेले नाही. या भुखंडाची सफाई करून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याची मागणी इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या वृक्षसंपदा नष्ट होत चालल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्यावेरणाच्या र्हासामुळेच वरूण राजाही भुतलावर भेट देण्यास फारसे स्वारस्य दाखवित नाही. जुईनगर सेक्टर 24 या ठिकाणी चिंचोली तलावानजिक असलेल्या स्मशानभूमीलगत एक भुखंड ट्री-बेल्टकरता राखीव आहे. हा भुखंड सिडकोकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झालेला आहे.तथापि हस्तांतरीत होवूनही मनपाने या ठिकाणी आजतागायत काहीही काम केलेले नाही. या भुखंडावर सध्या डेब्रिज व रॅबिटचे ढिगारे पडलेले असून भुखंडाला बकालपणा आलेला आहे. वास्तविक या भुखंडाचे महापालिका प्रशासनाकडून यापूर्वीच सुशोभीकरण होणे आवश्यक होते. ट्री-बेल्टसाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर मनपा प्रशासनाने लक्ष न दिल्याने आजमितीला या भुखंडाची दुर्रावस्था झालेली असल्याचे रवींद्र सावंत यांनी मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयास केला आहे.
आपण या भुखंडाची एकदा प्रत्यक्षच येवून पाहणी केल्यास आपणास चांगल्या कामासाठी आरक्षित असलेल्या भुखंडाचे सध्या काय स्वरूप आहे, हे आपल्या निदर्शनास येईल. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. सर्वत्र वृक्षारोपण सुरू असून पर्यावरणाबाबत व वृक्षसंपदा वाढविण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती झालेली आहे. ट्री-बेल्ट विकसित झाल्यास सेक्टर 24 परिसरातील पर्यावरणाला हातभार लागेल. परिसरातील बकालपणा काही अंशी संपुष्ठात येईल. स्थानिक रहीवाशांनाही निसर्गसंपदेचा लाभ घेता येईल. आपण या भुखंडाच्या सुशोभीकरणासाठी कार्यवाही करत या ठिकाणी लवकरात लवकर वृक्षारोपण करावे व रोपण केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याचे संबंधित विभागाला निर्देश द्यावेत अशी मागणी रवींद्र सावंत यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.