– साथीच्या आजाराचा पहिला बळी
- मुंबई : वडाळा येथे राहणाऱ्या ५ वर्षाच्या मुलाचा कावीळमुळे २२ जून रोजी कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात साथीच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात मुंबईकरांनी विषेश काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेने केली आहे.
काविळाचा संसर्ग रोखण्यासाठी दूषित अन्न आणि पाणी पिणे टाळा या विषयी जनजागृती करण्यात येत आहे. वडाळा येथील ५ वर्षाच्या मुलाला १३ जून रोजी काविळच्या उपचारांसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असूनही त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने या मुलाला १७ जून रोजी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचार सुरु असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. २२ जून रोजी या मुलाचा मृत्यू झाला. जुन महिन्यात काविळीचे एकूण १६६ रुग्ण आढळून आले आहेत. जुन २०१५ मध्ये कावीळचे ९९ रुग्ण होते. मे २०१६ मध्ये १३५ रुग्ण आढळले होते.
गॅस्ट्रोचे जून महिन्यात ९७९ रुग्ण आढळून आले आहेत. तर कॉलराचा १ रुग्ण आढळून आला आहे. दूषित पाण्यामुळे होणारे आजार जून महिन्यात आढळून आले आहेत. त्यामुळे पावसाच्या सुरुवातीला साथीच्या आजारांचा आलेख चढता असल्यामुळे विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेने केला आहे.
जून महिन्यात मलेरियाचे ४८२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत, तर मे महिन्यात मलेरियाचे ४२३ संशयित रुग्ण आढळले होते. तर डेंग्यूचे १५३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. मे महिन्यात १२९ रुग्ण आढळून आले होते. लेप्टोचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी जुन महिन्यात डेंग्यूचे ४ रुग्ण आढळले होते. पावसाळ्यात जागोजागी पाणी साठते, त्यातून चालणे टाळा असे आवाहन कार्यकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केले आहे. गेल्या वर्षी लेप्टोने डोके वर काढले होते, त्यामुळे मुंबईकरांनी विशेष काळजी घ्या, असेही डॉ. केसकर यांनी सांगितले आहे.