अनंतकुमार गवई
नवी मुंबई: न्हावा-शेवा परिसरातून चोरलेले ट्रेलर परराज्यात नेऊन त्यांची परस्पर विल्हेवाट लावणार्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्याची कामगिरी न्हावा-शेवा पोलिसांनी केली आहे. या टोळीकडून पोलिसांनी एका ट्रेलरसह मोटर ट्रेलरचे इंजिन आणि इतर सुटे भाग जप्त केले असून या टोळीने अशाच पद्धतीने अनेक ट्रेलर चोरुन त्यांची विल्हेवाट लावले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या टोळीची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ- २ चे पोलीस उपआयुक्त विश्वास पांढरे यांनी दिली.
सदर प्रकरणात अटक करण्यात आलेली टोळी न्हावाशेवा आणि आजुबाजुच्या परिसरातून ट्रेलर चोरुन नेत असे. त्यानंतर गुजरात बॉर्डरवर सदर ट्रेलर दुसर्या चालकाच्या ताब्यात देत असे. त्यानंतर दुसरा तिसर्याकडे त्यानंतर तिसरा चोरीच्या ट्रेलरची विल्हेवाट लावण्यासाठी तो ट्रेलर अहमदाबाद येथे नेऊन देत असे. अशाच पद्धतीने या टोळीने जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये न्हावा-शेवा परिसरातून ४० फुट लांबीचा ट्रेलर चोरुन नेला होता. न्हावा-शेवा पोलीस या ट्रेलर चोरीचा तपास करत असताना, उरणमधील दिपेश बारच्या पार्कींग मधून २७ लाख रुपये किंमतीचा दुसरा ट्रेलर या टोळीने चोरुन नेला. हा ट्रेलर चोरीला गेला. यानंतर सदरचा ट्रेलर महाराष्ट्र गुजरात सीमेवरुन जात असल्याची माहिती मिळताच न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गलंडे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख आणि त्यांच्या पथकाने सदर माहितीच्या आधारे या ट्रेलरचा माग काढण्यास सुरुवात केली.
या ट्रेलरचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सुरत आणि वासद टोलनाक्यावर फोनद्वारे माहिती देऊन वासद पोलिसांना चोरीचा ट्रेलर वासद टोलनाक्यावर थांबविण्यास सांगितले. यानंतर पोलिसांनी ट्रेलर चालक शिवबहादूर हिरालाल विश्वकर्मा याला ताब्यात घेऊन त्याने चोरुन आणलेला ट्रेलर जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी करुन सदर ट्रेलर वासद टोलनाक्याहुन पुढे घेऊन जाण्यासाठी आलेला दुसरा चालक सलीम उर्फ अश्कार मुन्शीरजा खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात आली असता, त्याने गणी आदमभाई सय्यद, अकबर गुलजादशहा फकीर, दाऊद अकबर फकिर आणि इम्रान हाजीबाई सेलोत या चौघांचा टोळीत सहभाग असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सदर चौघांना भावनगर येथील सिहोर येथून ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरुन आणलेले ट्रेलर गॅसकटरच्या सहाय्याने विल्हेवाट लावून त्याचे सुटे भाग अहमदाबाद येथील भंगार बाजारात वाशीद कुरेशी याला विकत असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अहमदाबाद येथील वाशीद कुरेशी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून २ लाख रुपये किंमतीचे मोटार ट्रेलरचे इंजिन आणि इतर सुटे भाग जप्त केले.
दरम्यान, अशाच पद्धतीने या टोळीने नवी मुंबई आणि आजुबाजुच्या परिसरातील अनेक ट्रेलर चोरुन नेऊन त्यांची विल्हेवाट लावले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या टोळीची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस उपआयुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.