शिर्डी : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्याकडे असलेली देश हादरविणारी माहिती दडवून ठेवू नये. ही बाब देशहिताची नाही. त्यामुळे एकनाथ खडसेंनी ‘तो’ गौप्यस्फोट करावाच, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. खडसे यांनी काल जळगाव येथे केलेल्या विधानासंसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, एकनाथ खडसेंकडे धक्कादायक व संवेदनशील माहिती असतानाही ते बोलणार नसतील तर त्यांनी का व कोणत्या स्वार्थासाठी मौन बाळगले, असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे देश हादरण्याची चिंता सोडून खडसेंनी ती माहिती उघड करण्याची गरज आहे.
आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भांत विरोधकांनी पुरावे न दिल्याचा खडसेंचा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले की, राज्यातील भाजप-शिवसेना मंत्र्यांच्या भ्ररष्टाचारा संदर्भात अनेक पुरावे समोर आले. विरोधी पक्ष, प्रसार माध्यमे आणि अनेक संस्था व व्यक्तींनी वेगवेगळे पुरावे दिले.
संबंधित यंत्रणांकडे औपचारिक तक्रारी दाखल करण्यात आल्या. परंतु,या पुराव्यांना सरकार पुरावे मानायलाच तयार नाही. समोर आलेले पुरावे हे पुरावेच नाहीत,असे सरकारला वाटत असेल तर त्यांनी सर्व मंत्र्यांवरील आरोपांची चौकशी आयोग कायद्यान्वये चौकशी सुरू करावी. मंत्र्यांच्या भ्रष्टाचारा संदर्भात समोर आलेले दस्तावेज हे पुरावे आहेत की नाहीत, याबाबत एकदाचे ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होऊन जाईल, असे आव्हान देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.