अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी, सानपाडा, सी.बी.डी.- बेलापूर, नेरूळ अशा अनेक ठिकाणच्या नागरिकांनी वाढीव वीज बिलासंदर्भात बेलापुरच्या आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेतली होती. यासंदर्भात आ. मंदा म्हात्रे यांनी वाशी येथील एम.एस.ई.डी कार्यालयात कार्यकारी अभियंता एस.एस.किन्नेर यांची नागरिकांसह नुकतीच भेट घेतली. नागरिकाना आलेली वाढीव बिले, बिलांवर मीटरचे फोटो नसणे, रीडिंग स्पष्टपणे न दिसणे, केबल खराब झाल्यास किंवा मिटरमध्ये बिघाड झाल्यास त्याचा नाहक खर्च ग्राहकांना करावा लागणे तसेच मिटरची रीडिंग वेळेवर न घेतल्यामुळे ग्राहकांना पडणारा भुर्दंड अशा अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन एम.एस.ई.डी.चे कार्यकारी अभियंता एस.एस.किन्नेर यांनी दिले. या प्रसंगी आमदार मंदा म्हात्रे यांच्यासमवेत एम.एस.ई.डी.चे आंधळे, नवी मुंबई भा.ज.पा. चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, मारुती भोईर, माजी नगरसेवक संपत शेवाळे, कृष्णा पाटील, माजी नगरसेवक जितेंद्र कांबळी, नगरसेवक दीपक पवार, एकनाथ मगडवार, विक्रम पराजुली, प्रमिला खडसे तसेच नागरिक उपस्थित होते.