नवी मुंबई : नवी मुंबईतील स्थानिकांच्या धार्मिक श्रद्धेचे परंपरागत ठिकाण असलेले राबले एम.आय.डी.सी तील सुलाईदेवी हा निसर्ग संपन्न परिसर प्रेक्षणीय पर्यटन स्थळ बनत आहे.पर्यावरणाशी सुसंगत अशी कामे या ठिकाणी नवी मुंबई मागणंगपालिका, वन विभाग आणि आमदार संदीप नाईक यांच्या आमदार विकास निधीमधून सुरू आहेत. आमदार नाईक यांनी आज या परिसराचा पाहणी दौरा केला. आणि या ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. निर्सगाने भरभरून वनसंपदा दिलेल्या असा सुलाईदेवीचा परिसर आहे. या ठिकाणी नवी मुंबईतील ग्रामस्थांचे श्रद्धेचे सुलाईदेवी पौराणिक मंदिर देखील आहे. नवी मुंबईकरांसाठी शहरातच पर्यटनस्थळ असावे या भूमिकेतून आमदार नाईक यांनी पुढाकार घेतला. या संदर्भात पाठपुरावा करून महापालिकेच्या माध्यमातून वनविभागाला विकासनिधी मिळवून दिला. त्याच बरोबर आपला आमदार निधी देखील दिला आहे. या निधीमधून या ठिकाणी तीन बंधाऱ्यांचे काम पूर्णत्वास गेले आहे. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या तत्वानुसार जलसंधारणासाठी हे बंधारे बांधण्यात आलेलं आहेत. या ठिकाणी फळ झाडांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती देऊन त्यामुळे नैसर्गिक आधिवासातच खाद्यान्न उपलब्ध होऊन या परिसरात पक्षांची संख्या निश्चितच वाढेल असा विश्वास आमदार नाईक यांनी व्यक्त केला. एखादे पर्यटनस्थळ विकसित होत असताना त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनी देखील निसर्गाची काळजी घ्यायला हवी. आपल्या कडून या ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही. तसेच वृक्षवल्लींची तोड होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घ्यायला हवी. असे आवाहन ही त्यांनी केले. सुलाईदेवी भागात ताडाची आणि सागाची झाडे बऱ्यापैकी असली तरी या जातींच्या झाडांची लागवड आणखी मोठ्या प्रमाणावर करावी अशी सूचना आमदार नाईक यांनी या प्रसंगी उपस्थित वन अधिकाऱ्यांना केली. आमदार नाईक यांच्या हस्ते आजच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी सुलाईदेवी परिसरामद्धे वृक्षरोपणाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला. यामध्ये वनविभाग, राधाबाई मेघे विद्यालय ऐरोली, प्रेरणा विद्यालय घणसोली आणि एस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. पाऊस सुरू असताना देखील वृक्षरोपणासाठी मोठ्या संख्येने आलेल्या विद्यार्थ्यांचे व इतर निसर्गप्रेमी नागरिकांचे आमदार नाईक यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना खास करून कौतुक केले. आजच्या पाहणीदौरा व वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी वन विभागाचे अधिकारी कांबळी, कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस ऐरोली विधानसभा संघाचे तालुका युवक अध्यक्ष राजेश मढवी, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य वासुदेव पाटील, परिवहन मंडळाचे माजी सदस्य यशवंत पाटील, गणेश पाटील, स्वप्नील झगडे, सुलाईदेवी मंदिराचे पुजारी दादू पाटील, ऐरोलीतील राधाबाई मेघे विद्यालयाचे विद्यार्थीव शिक्षक, घणसोलीतील प्रेरणा विद्यालयाचे विध्यार्थी व शिक्षक, एस बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.