* सभागृहाने फेटाळला १३ कोटी रूपयांचा प्रस्ताव
* चीनच्या कंपनीकडून खरेदी करणार होते ‘मल्टी पॅरामिटर रूग्ण संचालन’
मुंबई : एनएसजीच्या सदस्यात्वावरून चीनने भारताला केलेला कडवट विरोध भारतीय विसरणे शक्यच नाही. याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. मुंबईत चीनी मालावर बहिष्कार टाकण्यास सुरूवात झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात एका चीनी कंपनीकडून खरेदी केल्या जाणाऱ्या १३ कोटी रूपयांचा प्रस्ताव नगरसेवकांनी फेटाळून लावला आहे. यापुढे चीनी कंपन्यांना ठेका देण्याचा प्रत्येक प्रस्ताव फेटाळला जाणार असल्याचे नगरसेवकांनी या बैठकीत सांगितले.
महापालिका रूग्णालयाकरता २७५ ‘मल्टी पॅरामिटर रूग्ण संचालन’ मशिन खरेदी करण्याकरता निविदा काढण्यात आली होती. या कामाकरता तीन कंपन्यांनी स्वारस्य दाखविले होते. मनपा प्रशासनाने कमी दराची निविदा भरणाऱ्या चीनच्या संजेन मिड्रा बायोमेडिकल कंनीकडून ‘मल्टी पॅरामिटर रूग्ण संचालन’ मशिन खरेदी करण्याचा प्रस्ताव मंगळवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला होता. २७५ ‘मल्टी पॅरामिटर रूग्ण संचालन’ मशिनपैकी १०५ मशिन्स केईएम रूग्णालयाकरता, ३९ मशिन्स सायन रूग्णालयाकरता, ४१ मशिन्स सायन रूग्णालयाकरता, २० कूपर आणि ३० मशिन्स कस्तूरबा रूग्णालयाकरता खरेदी करण्यात येणार होते.
मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावावर चर्चा करताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी चीनच्या एका कंपनीकडून वैद्यकीय साधनसामुग्री खरेदी करण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. याच चीनी कंपनीकडून यापूर्वीही ‘मल्टी पॅरामिटर रूग्ण संचालन’ मशिन खरेदी करण्यात आले होते. तथापि या मशिनची देखभाल संबंधित कंपनीकडून केली न गेल्याने आज हे मशिन वापरात नसल्याचे समाजवादी पक्षाच्या नगरसेवक रईस शेख यांनी सांगितले. डॉक्टरांच्या तक्रारीनंतरही पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. भाजपा नगरसेवक मनोज कोटक यांनी चीनी उत्पादनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा प्रस्तावच रद्द करण्याची मागणी केली. या मागणीचे सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी समर्थन केले. एनएसजीच्या सदस्यत्वावरून भारत चीनला कडवट विरोध करत असताना आपण चीनी कंपन्यांचा माल का खरेदी करावा, असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला.
अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी सांगितले की, चीनच्या कंपनीने ‘मल्टी पॅरामिटर पेंशट मॉनिटर’ खरेदी करण्याकरता कमी दराची निविदा सादर केली होती. रूग्णालयांची गरज पाहता हा प्रस्ताव मंजुर होणे आवश्यक असल्याचे मुखर्जी यांनी सांगितले. परंतु नगरसेवकांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला.