- मुंबई : धावत असलेल्या एसटी बसचा ठावठिकाणा समजण्यासाठी एसटी महामंडळाने सर्व बसेसना ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. बसेसचा ठावठिकाणा समजण्याबरोबरच त्या वेळेत धावत आहेत की नाही याची माहितीही त्यामुळे समजण्यास मदत होईल. ही यंत्रणा बसविण्यासाठी एसटी महामंडळाकडून काही प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत.
- सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात १८ हजार बसेस आहेत. यात साध्या आणि सेमी लक्झरी बस सोडता सर्व शिवनेरी व्होल्वो बसेसना ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’ बसविण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे बस सध्या कोणत्या मार्गावर आहे आणि त्यांची सद्य:स्थिती काय आहे हे समजण्यास मदत होते. त्यामुळे बसेसचे वेळापत्रक सुधारण्यासही मदत होत असल्याचे एसटीचे अधिकारी सांगतात. व्होल्वो बस ताफ्यात घेतानाच अशा प्रकारची यंत्रणा बसविण्याची अट कंत्राटदारांना आधीच घालण्यात आली होती. त्याचा बराच फायदा होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने सर्व साध्या आणि निम आराम बसना ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धावत असलेल्या एसटी बसचा ठावठिकाणा समजेल. त्याचप्रमाणे एखाद्या नियोजित आणि अधिकृत थांब्यावर बस न थांबल्यास त्याची माहितीही महामंडळाला समजेल आणि त्यानुसार कारवाईदेखील चालक व वाहकांवर करता येईल.
महत्त्वाची बाब म्हणजे एसटी बस आगार आणि स्थानकात वेळेवर न पोहोचण्याचे कारण यातून समजेल. त्यानुसार त्या मार्गांवरील बसेसचे वेळापत्रक सुधारण्यावरही यातून भर देता येईल, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.
- अपघात झाला तर तो कोणत्या ठिकाणी झाला आहे आणि त्या ठिकाणी मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील. ही यंत्रणा चांगल्या तऱ्हेने राबवण्यासाठी एक नियंत्रण कक्षही तयार केला जाईल. सध्या व्होल्वो एसी बसला जरी ही यंत्रणा असली तरी ती परस्परित्या हाताळण्यात येत असून त्यासाठी नियंत्रण कक्ष सध्या तरी नाही. त्यामुळे सर्व बसेस या यंत्रणेखाली आणताना एक नियंत्रण कक्षही स्थापन केला जाणार आहे.
एसटी बसना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम बसविण्याचा विचार केला जात आहे. त्याची निविदा प्रक्रिया मात्र अजून झालेली नाही. या यंत्रणेमुळे एसटी बसचा ठावठिकाणा समजण्यास मदत मिळेल.
– दिवाकर रावते
(परिवहन मंत्री व एसटी अध्यक्ष)