नवी मुंबई: २१व्या शतकाचे प्रतिनिधीत्व करणार्या आणि शिक्षणाची सुबत्ता असणार्या नवी मुंबईत बालविवाहाचा अमानुष व मानवतेला काळीमा फासणारा प्रकार दिघा येथे उघडकीस आला आहे. गरीबीला वैतागलेल्या मातेने आपल्या ९ वर्षीय मुलीचा विवाह २५ वर्षीय युवकासोबत करून दिल्याचे उजेडात आले आहे. रबाले पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून या घटनेचा बालविवाहाच्या आजही चालत असल्याचे उघडकीस आले आहे.
गरीबीमुळे तीन मुलींचा सांभाळ करणे अवघड जात असल्याने दिघा येथील यादव नगर भागात राहणार्या एका महिलेने आपल्या ९ वर्षीय मुलीचा २५ वर्षीय तरुणासोबत लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बालविवाहाची माहिती मिळाल्यानंतर रबाले एमआयडीसी पोलिसांनी बालविवाह करुन देणार्या मातेसह तिच्या अल्पवयीन मुलीशी विवाह करणारा तरुण आणि बालविवाह लावून देणारा पंडीत अशा तिघांना अटक करण्याची कारवाई केली आहे. २१व्या शतकातील शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरामध्ये बाल विवाहाचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
सदर प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुलीची आई शिला राजेंद्र चौहान (४५), तिच्या मुलीशी लग्न करणारा सुनिल रामबेलास चौहान (२५) आणि बालविवाह लावून देणारा पंडीत नरसिंग रामनारायण पांडे (५५) या तिघांचा समावेश आहे. सदर सर्वजण दिघा येथील यादवनगर मधील ठाकूर चाळीत रहाण्यास असून गत ८ जुलै रोजी शिला चौहान हिने आपल्या सर्वात मोठ्या ९ वर्षीय मुलीचा सुनिल चौहान या २५ वर्षीय तरुणासोबत विवाह ठरविला होता. त्यानुसार पंडीत नरसिंग पांडे याने मुंब्रादेवी डोंगरातील आत्माराम मंदिरासमोर विवाह लावून दिला. मात्र, त्याचवेळी या बालविवाहाची माहिती विक्रोळी येथे राहणारे समाजसेवक मनोज मिश्रा यांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ रबाले एमआयडीसी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे, पोलीस उपनिरीक्षक कैलाश कोडग आणि त्यांच्या पथकाने तत्काळ मुंब्रादेवी डोंगरात आत्माराम मंदिराजवळ जाऊन पाहणी केली. मात्र, तोपर्यंत तेथील लग्न समारंभ आटोपून सर्वजण यादवनगर येथील घरी गेल्याने पोलिसांनी वेळ न दवडता यादवनगर येथील घरी जाऊन पाहणी केली. यावेळी शिला चौहानची ९ वर्षीय मुलगी बाजुच्या खोलीमध्ये सुनिल चौहान याच्यासह नव्या कोर्या साडीमध्ये सिंदूर लावून, मंगळसूत्र घातलेल्या स्थितीत आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ शिला चौहानसह अल्पवयीन मुलीशी लग्न करणारा तरुण आणि लग्न लावून देणारा पंडीत या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, त्यांनी बालविवाह केल्याची कबुली दिली. त्यानुसार तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांनी दिली. सदर प्रकरणात अल्पवयीन मुलीशी लग्न करणार्या आरोपीच्या नातेवाईकाने बालविवाह करतानाचे मोबाईलमध्ये फोटो काढले असून सदर मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. न्यायालयाने या सर्व आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे. अटेकतील शिला चौहान हिच्या पतीला दारुचे व्यसन असून गेल्या वर्षभरापूर्वी तो शिला आणि तीन मुलींना सोडून गेला आहे. त्यामुळे एकटी पडलेल्या शिलाला तिचे नातेवाईक सुद्धा जवळ करीत नसल्याने शिला घरकाम करुन आपल्या तीन लहान मुलींचे पालन-पोषण करत होती. मात्र, वाढत्या महागाईमुळे गरीबीचे चटके सहन होत नसल्याने तसेच आपल्या मुली वाईट संगतीला लागून वाया जाऊ नये यासाठी तिने सुनिल चौहान याच्यासोबत आपल्या सर्वात मोठ्या नऊ वर्षीय मुलीचा बालविवाह रचल्याची कबुली शिला चौहान हिने पोलिसांकडे दिली आहे. शिला चौहानच्या अटकेनंतर तिच्या तिनही लहान मुलींचा ताबा तिच्या नातेवाईकांकडे देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांनी दिली.