रेशन कार्डावरून उध्दवने माझे नाव काढले
मुंबई : मी ऐश्वर्याचा पिता नाही, ऐश्वर्य हा स्मिता ठाकरेंचा मुलगा आहे असे बुधवारी जयदेव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीवरुन वाद सुरु असून या प्रकरणाची सुनावणी सध्या उच्च न्यायालयात सुरु आहे.
जयदेव ठाकरे यांनी न्यायालयाला ऐश्वर्य आपला मुलगा नसल्याचे सांगितले. बाळासाहेबांनी त्याला वारस केले असून, मातोश्रीत पहिला मजला दिला आहे. स्मिता ठाकरे ही जयदेव ठाकरे यांची पूर्वपत्नी आहे. दोघांचा घटस्फोट झाला आहे.
स्मिता ठाकरे यांना राजकारणात पूर्वीपासून रस होता. मात्र, माँसाहेब गेल्यानंतर त्यांना राजकारणाची अधिक ओढ लागली. मात्र, बाळासाहेबांना हे पटत नव्हते, असे जयदेव यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीसंदर्भातील उलटतपासणीत सांगितले. स्मिता ठाकरे यांना राजकारणात रस वाटू लागल्याने आम्हा पती-पत्नीत वाद होऊ लागले. त्यामुळे बाळासाहेबांच्या तब्येतीला त्रास होऊ नये म्हणून त्यांच्याच सांगण्यावरून मी तात्पुरत्या स्वरूपात ‘मातोश्री’ निवासस्थान सोडले. उद्धव ठाकरे यांनी रेशन कार्डावरून माझे नाव काढले, अशी माहितीही त्यांनी दिली होती.
बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवरून जयदेव व उद्धव यांच्यात वाद सुरू झाला. जयदेव यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यावरील सुनावणी न्या. गौतम पटेल यांच्यापुढे होती. उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील रोहित कपाडिया यांनी जयदेव यांची उलटतपासणी घेतली. दुसऱ्या दिवशी जयदेव यांना सुमारे ८० प्रश्न विचारण्यात आले.
‘जाहीर सभांमध्ये जवळच्या व्यक्तीवर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करावी लागते. बाळासाहेब त्यांच्या निकटवर्तीयांवर अशीच टीका करायचे आणि रात्री सगळे एकत्र यायचे. हे मला पटत नसल्याने मी राजकारणापासून दूर राहिलो,’ असे जयदेव यांनी स्पष्ट केले.