- पुणे – मिरजहून रेल्वेने लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यशासनाने सुरू केलेली ‘जलदूत’ 31 जुलै पर्यंतच धावण्याची शक्यता आहे. राज्यशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडे या तारखेपर्यंतचीच रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ही मुदतवाढ करण्याबाबत अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे ही गाडी बंद करावी लागणार असल्याचे रेल्वेच्या प्रशासकीय सुत्रांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान, लातूरला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण अद्यापही कोरडेच असून या धरणामध्ये अवघा ०.६२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे रेल्वेने केला जाणारा पाणी पुरवठाही बंद झाल्यास ऐन पावसाळयातही लातूरकरांना पाण्यासाठी वणवन करावी लागण्याची चिन्हे आहेत.
लातूर शहराची लोकसंख्या सुमारे 5 लाखां़च्या आसपास असून शहराला मांजरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, मागील वर्षी मांजरा धरण कोरडेठाक असल्याने लातूरकरांचे पिण्याचे पाणीही मिळणे कठीण बनले होते. त्यामुळे राज्यशासनाने तातडीने उपाय योजना करून थेट केंद्रातूनच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून मिरजहून लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी विशेष रेल्वे उपलब्ध करून घेतली होती. ही गाडी १९ एप्रिल पासून मिरजहून सुरू करण्यात आली आहे. या गाडीतून एका दिवशी ५० टँकरच्या रेक द्वारे २५ लाख लिटर पाणी लातूरला पाठविले जाते. तर निम्न तेरणा धरणातून टँकरद्वारे २५ लाख लिटर असे प्रतिदिन ५० लाख लिटर पाणी लातूरसाठी उपलब्ध करून दिले जाते. हे पाणी प्रती व्यक्ती २०० लीटर प्रमाणे टँकरद्वारे वाटप केले जात आहे.