मुंबई – नवी मुंबईतील नेरूळमध्ये आंतरजातीय मुलीसोबत प्रेम असल्याच्या संशयावरून दलित समाजाच्या अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (खरात) पक्षाने केला आहे. यामुळे राज्यातील दलितांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने अॅट्रोसिटी समितीची बैठक बोलावण्याची मागणी रिपाइंचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. रिपाइंचे अध्यक्ष सचिन खरात यांनी सांगितले की, या घटनेचा करावा तितका निषेध कमीच आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून संबंधित आरोपींना तत्काळ अटक करून कारवाई करावी. नाहीतर भारतीय जनता पार्टी अशा जातीयवाद्यांना प्रोत्साहन देत आहे, यावर शिक्कामोर्तब होईल. २४ तासांत आरोपींविरोधात कडक पावले उचलल्याचे निदर्शनास आले नाही, तर गुरूवारपासून राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खरात यांनी दिला आहे. नवी मुंबईतील नेरुळच्या एसबीआय कॉलनीत राहणाऱ्या स्वप्नील सोनवणे याचे दारावे गावातील आगरी समाजाच्या १४ वर्षीय मुलीसोबत प्रेम संबंध होते. त्यांच्या प्रेमाची माहिती मुलीच्या भावाला मिळाली होती. यावरून मुलीच्या भावाने साथीदारांसह स्वप्नीलच्या घरी जाऊन धमकी दिली होती, तसेच घरी येऊन माफी मागण्याची मागणी केली होती. स्वप्नीलचे कुटुंबीय मुलीच्या घरी गेले असता त्यांना जबर मारहाण झाली होती. या मारहाणीत जखमी झालेल्या स्वप्नीलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.