अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका जनतेला अधिक उत्तम नागरी सुविधा पुरविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून महानगरपालिका एकट्याने विकास करू शकत नाही त्यामध्ये नागरिकांचा सहभाग हवाच असे सांगत नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी नागरिकांशी सुसंवाद साधून नवी मुंबईच्या विकास कार्यात नागरिकांच्या संपूर्ण सहकार्याची गरज व्यक्त केली.
महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या अभिनव उपक्रमाला नागरिकांचा ठिकठिकाणी सतत वाढता प्रतिसाद लाभत असून आज से.26, नेरूळ येथील पाम बीच वॉटर बॉडीजवळ महापालिकेने विकसित केलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे झालेल्या आठव्या वॉकमध्ये नेरूळ, सीवूड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अशाप्रकारे नागरिकांचे म्हणणे समजून, जाणून घेणा-या व त्यावर तत्पर कार्यवाहीचे निर्देश देणा-या आयुक्तांच्या कार्यप्रणालीचे अनेक नागरिकांनी विशेषत्वाने अभिनंदन केले.
याप्रसंगी नागरिकांशी सुसंवाद साधताना आयुक्तांनी ज्याप्रमाणे नागरिक महापालिकेकडून वेगवेगळ्या अपेक्षा ठेवतात त्याप्रमाणे नागरिकांकडूनही शहर विकासासाठी पूरक अपेक्षा असल्याचे मत व्यक्त केले. ज्यामध्ये नागरिकांनी सामाजिक जबाबदारी जपत कचरा कुठेही न टाकणे, पदपथ चालण्यासाठी मोकळे ठेवणे, पार्कींगसाठी निश्चित जागेतच पार्कींग करणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे त्याचप्रमाणे कचरा घरातून देतानाच ओला व सुका असा वेगवेगळा देणे, सोसायट्यांनीही त्यासाठी महापालिकेने पुरविलेल्या हिरव्या व निळ्या रंगांच्या कुंड्यातून ओला व सुका कचरा महापालिकेच्या कचरा गाडीत वेगवेगळा देणे, गरजेपुरताच पाण्याचा वापर करून अपव्यय टाळणे अशा छोट्याछोट्या गोष्टींची अपेक्षा व्यक्त केली. सोसायट्यांनी आपला कचरा ओला व सुका असा वेगवेगळा द्यावा म्हणजे कोणते प्रश्नच उरणार नाहीत असेही ते म्हणाले.
प्रत्येकाला जागतिक प्रमाणानुसार 135 लिटर पाणीपुरवठा प्रतिदिन प्रतिव्यक्ती केला जात असून पाणीपुरवठ्याचे आपल्या सदस्यांना अंतर्गत योग्य वितरण करण्याची जबाबदारी सोसायट्यांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाणीवितरण प्रणाली व पाण्याच्या दरांबाबत अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या ‘वॉक विथ कमिशनर’ मध्ये प्रामुख्याने रस्ते, अतिक्रमणे, पार्कींग, रस्ते अपघात, पथदिवे, फेरीवाले अशा विविध विषयांवरील निवेदने प्राप्त झाली. त्यावर आयुक्तांनी लगेच करावयाच्या कामांबाबत 7 ते 15 दिवसात कार्यवाही करण्याचे व धोरणात्मक कामांविषयी आवश्यकता तपासून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
विकास कामे करताना त्या नागरी सुविधा कामांची आवश्यकता लक्षात घेण्यात येईल तसेच समतोल व सुयोग्य विकासावर भर दिला जाईल असे स्पष्ट करीत आयुक्तांनी पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करूनच विकास प्रकिया राबविली जाईल असे सांगितले. यामध्ये जागरूक नागरिकांचा सक्रीय सहभाग महत्वाचा असल्याचेही त्यांनी अधोरेखीत केले.
सकाळी 6 पासून उत्साहाने उपस्थित असलेल्या नागरिकांसमवेत महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी सुरूवातीला वॉटरबॉडी भोवती ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विकसित केलेल्या जॉगींग ट्रॅकवरून चालत परिसराची पाहणी केली व नागरिकांशी सुसंवाद साधला. आयुक्तांच्या भेटीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांचे मुक्तकंठाने कौतुक केले. महिलांसह विविध वयोगटातील उपस्थित नागरिकांनी, ‘लवकरच आमच्या विभागात पुन्हा या’ असे निमंत्रणही त्यांना दिले.