अनंतकुमार गवई
नवी मुंबई ः नवीन पनवेल येथे राहणार्या सविता मधुकर कांबळे यांची तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक करणारा त्यांचा भाऊ डॉ. संजयकुमार राजाराम यादव याला खांदेश्वर पोलिसांनी गजाआड केले आहे.
‘खांदेश्वर पोलीस स्टेशन’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई यांच्या पथकाने तातडीने सूत्रे हलवून डॉ. संजयकुमार यादव याला अटक केली. डॉ. संजयकुमार यादव याने ज्या बँकेत पैसे जमा केले होते त्या बँकेशी संपर्क साधून आणि आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करून पोलिसांनी ते पैसे रोखून ठेवल्याने येत्या काही दिवसांमध्ये सविता कांबळे यांना त्यांची रक्कम परत मिळणार आहे.
खांदेश्वर पोलिसांनी डॉ. संजयकुमार यादव याच्याविरुध्द फसवणुकीचा तसेच पैशाचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सविता कांबळे यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांना विमा आणि कंपनीमधून पैसे मिळाले होते. त्या पैशाची मुदत ठेव करून देतो असे सांगून डॉक्टर असलेला त्यांचा भाऊ डॉ. संजयकुमार यादव याने सविता यांच्याकडून दोन चेक घेतले आणि बहिणीला त्यावर सही करायला सांगितले. मात्र, घेतलेले चेक संजयकुमार यादव याने परस्पर स्वतःच्या पाटण, सातारा येथील महाराष्ट्र बँकेच्या खात्यात जमा केले आणि घेतलेल्या पैशांची मुदत ठेव केली नाही.
बँकेतून पैसे काढल्याचा मेसेज सविता कांबळे यांच्या मुलीच्या मोबाईलवर आल्यावर तिने आपल्या मामाकडे (संजयकुमार यादव) विचारणा केली असता, त्याने सदर रक्कम मुदत ठेव करण्यासाठी काढली असल्याचे खोटे सांगितले. यानंतर डॉ. संजयकुमार यादव याने सदर रक्कम वैयक्तिक कामाकरिता काढली असल्याची कबुली दिली. याबाबत सविता कांबळे यांनी खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी डॉ. यादव याला ताब्यात घेतले आणि याबाबतची माहिती संबंधित बँकांनासुद्धा कळवून बँक व्यवहार रोखून ठेवले.
या संदर्भात २१ जुलै रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये भेट देत सविता कांबळे यांचीही विचारपूस केली. तसेच खांदेश्वर पोलिसांचे तत्परतेबद्दल कौतुक केले. सविता कांबळे यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.